ट्रक चालकाला मारहाण करून लुटले ; भुसावळातील आरोपी जाळ्यात


भुसावळ- छत्तीसगड राज्यातील ट्रक चालकाला अडवत मारहाण करून रोख रक्कमेसह मोबाईल लांबवल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावरील न्यू रूप टाईल्ससमोर 23 जुन 2019 रोजी पहाटे दिड वाजता घडली होती. या गुन्ह्याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी शहरातील राहुल नगरातील दोघा संशयीतांना अटक केली आहे. दरम्यान, दोघा संशयीतांविरुद्ध शहर पोलिसात यापूर्वी गोळीबार केल्याप्रकरणी गुन्हादेखील दाखल आहे.

गोपनीय माहितीवरून आवळल्या मुसक्या
माडवी येथून केमिकल पावडर भरून रायपूरकडे जाणार्‍या ट्राला (सी.जी.04 एमए 7725) वरील चालक अजयकुमार शैलेंद्रकुमार तिवारी (रा.चरोदा, जि.दुर्ग छत्तीसगढ) यांना अडवत दुचाकीला कट का मारला, असे म्हणत दोघांनी अडवून मारहाण करत त्याच्याकडील नऊ हजार 550 रुपये तसेच 15 हजार रुपये किंमतीचा मोबाईल हिसकावून पोबारा केला होता. या गुन्ह्यातील आरोपींचा दुचाकी क्रमांक व गोपनीय माहितीवरून तपास सुरू असतानाच बाजारपेठ पोलिसांनी करण किसन इंगळे (24) व दीपक श्रवण लोखंडे (24, दोन्ही रा.राहुल नगर, भुसावळ) यांना गार्ड लाईन परीसरातून सापळा रचून अटक करण्यात आली. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड व बाजारपेठ पोलिस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनोज ठाकरे, हवालदार सुनील जोशी, नाईक किशोर महाजन, रमण सुरळकर कॉन्स्टेबल विकास सातदिवे, ईश्वर भालेराव आदींच्या पथकाने केली.


कॉपी करू नका.