खेडी सिलिंडर स्फोटाने हादरले : चार घरे आगीत खाक
जळगाव (13 नोव्हेंबर 2024) : जळगाव शहरात रथोत्सवाचा उत्साह पाहण्यासाठी खेडी शिवारातील कुटूंब शहरात आल्यानंतर खेडी शिवारातील डॉ. आंबेडकर नगरात असलेल्या एका भागात घरात गॅस सिलेंडरचा स्फोट होताच नजीकच्या चार पार्टीशनच्या घरांनीही पेट घेतला. ही घटना मंगळवार, 12 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली आहे. या आगीत चार कुटुंबांच्या घरातील संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या.
आग विझवण्यासाठी कसरत
रस्त्यावरील गल्लीत अंधार आणि रस्ते कमी रुंदीचे असल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली. तरीदेखील महानगरपालिकेच्या दोन अग्निशमन बंबाच्या मदतीने ही आग विझविण्यात आली.
सिलिंडर स्फोटानंतर भडकली आग
कार्तिक एकादशीच्या निमित्ताने जळगाव शहरात श्रीराम रथोत्सव असल्याने रथोत्सव पाहण्यासाठी खेडी शिवारातील डॉ.आंबेडकर नगरातील जवळ-जवळ राहणारे चारही कुटुंब हे रथोत्सव पाहण्यासाठी मंगळवार, 12 नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता आले असता सायंकाळी सात वाजेच्या सुमारास एका पार्टेशनच्या घरात अचानक आग लागली. या आगीमुळे घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. पहाता-पाहता एकापाठोपाठ चारही पार्टेशनच्या घरांना भीषण आग लागली. दरम्यान आग लागल्यानंतर काही नागरिकांनी व तरुणांनी शेजारी राहणार्या काहींच्या घरातील गॅस सिलेंडर उचलून थेट नाल्यात फेकल्याने मोठा अनर्थ टळला.
स्थानिकांचे आग विझवण्यासाठी परिश्रम
आगीची माहिती मिळाल्यानंतर जळगाव महानगरपालिकेचे दोन अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले परंतु यावेळी रस्ते अरुंद आणि अंधार असल्या कारणामुळे वाहन जाण्यास मोठी अडचण झाली. शेवटी तरुण व नागरिकांच्या मदतीने ही आग विझवण्यास मदत झाली. तोपर्यंत चारही घरातील संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या.