जळगावात ऑक्सीजन सिलेंडरचा स्फोटानंतर रुग्णवाहिका पेटली : सुदैवाने चौघे बचावले
जळगाव (14 नोव्हेंबर 2024) : धरणगावहून जळगावकडे येणार्या रुग्णवाहिकेतील ऑक्सीजन सिलेंडरचा स्फोट झाल्यानंतर रुग्णवाहिकेला आग लागली. ही घटना शहरातून जाणार्या राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली.
चालकाच्या सतर्कतेचे चौघे बचावले
धरणगाव येथून जळगावकडे येणार्या (एम.एच.14 सी.एल.0791) या क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला राष्ट्रीय महामार्गावरील गुजराल पेट्रोल पंपच्या जवळ अचानक आग लागली. यात असलेल्या ऑक्सीजन सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. यातील ड्रायव्हरने तत्काळ प्रसंगावधान राखत अँब्युलन्सला थांबवली व चालकासह रुग्णवाहिकेतील चौघे बाहेर पडल्याने बचावले.
प्रसुत झालेल्या महिलेसह चौघे बचावले
रुग्णवाहिकेत हॉस्पीटलमध्ये प्रसूती झालेली महिला ही आपल्या बाळाला सोबत घेऊन घरी जात होती. त्यांच्या सोबत एक डॉक्टर देखील होते. ड्रायव्हरने प्रसंगावधान राखल्यामुळे हे चौघे पेटत्या रूग्णवाहिकेतून सुरक्षितपणे बाहेर पडल्याने या अपघातात कोणतीही प्राणहानी झाली नाही.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्नीशमन पथकाने तात्काळ धाव घेऊन ही आग आटोक्यात आणली. यात ही रुग्णवाहिका जळून खाक तर या घटनेमुळे वाहतुकीची काही काळ कोंडी झाली. पोलिसांनी काही काळाने वाहतूक सुरळीत केली.