भुसावळात 191 ज्येष्ठ, दिव्यांग मतदारांनी केले गृह मतदान
भुसावळ (14 नोव्हेंबर 2024) : विधानसभा निवडणुकीसाठी पलंगाला खिळलेल्यांसह ज्या उमेदवारांचे वय 85 पेक्षा जास्त आहे व जे मतदानाला येऊ शकत नाही, अश्या मतदारांचे मतदान निवडणूक यंत्रणेकडून घरी जाऊन घेण्यात आले. मतदारसंघात 201 ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांचे मतदान होते. मंगळवारी व बुधवारी 17 पथकांनी 191 मतदारांच्या निवासस्थानी जावून त्यांचे मतदान नोंदवले. दरम्यान, चार मतदार बाहेरगावी असल्याने त्यांचे मतदान होवू शकले नाही तर सहा मतदार मयत असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
दोन दिवस यंत्रणेकडून होम वोटींग
मंगळवार, 12 व बुधवार, 13 असे दोन दिवस निवडणूक यंत्रणेकडून होम वोटींगची व्यवस्था करण्यात आली. मंगळवारी सकाळी सात वाजेला प्रांत कार्यालयात होम वोटींगसाठी नियुक्त केलेले 17 पथकातील कर्मचारी त्यांच्या सोबत बीएलओ अश्यांनी त्यांच्या नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रातील ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांची त्यांच्या घरी जाऊन मतदान करून घेतले. यावेळी निवडणूक यंत्रणेकडून या प्रक्रियेचे चित्रीकरण करण्यात आले. सकाळपासून सुरू झालेले मतदान संध्याकाळी सहापर्यंत सुरू होते. पहिल्याच दिवशी 201 पैकी 185 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तर दुसर्या दिवशी सहा ज्येष्ठांचे मतदान नोंदवण्यात आले. मतदारसंघातील 201 पैकी 185 मतदारांचे गृह मतदान नोंदवण्यात आले तर चौघे बाहेरगावी असल्याने त्यांचे मतदान होवू शकले नाही तर सहा जण मयत असल्याचे प्रशासनाने कळवले आहे.
29 दिव्यांगांनी केले मतदान
होम वोटींगच्या प्रक्रियेत 29 दिव्यांग मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला तर 157 ज्येष्ठ व 85 पेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांनी मतदान केले. यात काही मतदार हे आजारी असून ते मतदान केद्रापर्यंत येऊ शकत नाही, अश्याही मतदारांचा यात समावेश होता. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.सचिन पानझाडे यांनी सर्व गृहमतदानाची जबाबदारी पार पाडली.