जळगावात रुग्णवाहिकेच्या स्फोटानंतर जिल्हाधिकार्‍यांनी दिले चौकशीचे आदेश


जळगाव (14 नोव्हेंबर 2024) : जळगाव शहरातून जाणार्‍या महामार्गावर खोटे नगराजवळ बुधवार, 13 नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास 108 या रुग्णवाहिकेला आग लागली. तत्काळ रुग्णवाहिकेतील रुग्णांना खाजगी वाहनाने रुग्णालयात हलविण्यात आले. कुणालाही ईजा अथवा दुखापत झाली नाही. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तत्काळ याची माहिती घेवून पोलीस विभागाला घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले.

प्रशासनाकडून स्फोटाची चौकशी होणार
पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. परिवहन विभागाचे पथक ही घटनास्थळी पोहोचले. सर्व बाजुंनी चौकशी सुरू असून ही रुग्णवाहिका फोर्स या कंपनीकडून बनविलेली आहे. फोर्स मोटरचे टीम जळगावसाठी रवाना झाली असून तेदेखील परिवहन आणि पोलीस विभागाला तपासात मदत करणार आहे आणि त्याच्याशिवाय 108 रुग्णवाहिका व्यवस्थापनालाही बोलावून घेण्यात आले आहे. ते पण या ठिकाणी येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

या रुग्णवाहिके ऐवजी इतर जिल्ह्यातून दुसरी रुग्णवाहिका रुग्णसेवेसाठी उपलब्ध करून देण्याची सूचना आरोग्य विभागाला करण्यात आली आहे.ज्यामुळे जळगाव जिल्ह्यामध्ये रुग्णवाहिकेचे प्रमाण पुरेसे राहील आणि जळगाव जिल्ह्यात रुग्णवाहिकेची कमतरता भासणार नाही. त्यानुसार पर्यायी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येत आहे.

घटनास्थळावर अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी भेट दिली असून संपूर्ण घटनेवर जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी लक्ष ठेवून असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.


कॉपी करू नका.