176 वर्षांची परंपरा : फैजपूर शहरात उद्या स्वयंभू पांडुरंग रथ महोत्सव
फैजपूर (14 नोव्हेंबर 2024) : सा:क्षात स्वयंभू पांडुरंग रथोत्सवाचे यंदाचे 176 वर्ष असून शतकोत्तर अमृत महोत्सवी वर्ष साजरे करणार्या या रथोत्सवाला मोठी धार्मिक परंपरा आहे. खुशाल महाराज देवस्थानतर्फे रथोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. शुक्रवार, 15 रोजी त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी साक्षात स्वयंभू पांडुरंग रथावर विराजमान होऊन भक्तांच्या भेटीला येणार असल्याने शहर तथा परिसरातील भक्तांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.
175 वर्षांची परंपरा
अखंडितपणे गेल्या 175 वर्षापासून सुरू असलेल्या या रथोत्सवानिमित्त विविध धार्मिक व कीर्तन महोत्सव कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भव्य दिव्य अशा या रथोत्सवाचे स्वरूप असणार आहे. शुक्रवारी दुपारी तीन वाजता रथोत्सवाच्या महापूजेचे मानकरी शहरातील डॉ.अमित हिवराळे, डॉ.मृणालिनी हिवराळे या दाम्पत्याच्या हस्ते महापूजा होणार आहे. यावेळी शहर तथा परिसरातील संत महंत, वारकरी, टाळकरी इस्कॉन भक्त मंडळ यांची उपस्थिती राहणार आहे.
दुपारी तीन वाजता रथोत्सव मिरवणूक
रथोत्सव मिरवणूक दुपारी तीन वाजता रथ गल्लीपासून सुरू होईल. लक्कडपेठ, कासार गल्ली, सुभाष चौक, खुशाल भाऊ रोड, जुने मुलींचे हायस्कूल, ब्राह्मण गल्ली या मार्गाने जाऊन रथगल्ली येथे मिरवणुकीचा समारोप होईल.
16 रोजी पालखी सोहळा
शनिवार, 16 रोजी सायंकाळी 6 ते रात्री 10 तर 17 रोजी दुपारी चार ते सायंकाळी सात वाजेपर्यंत पालखी सोहळा होणार आहे. 21 रोजी सकाळी 9 ते 11 मुक्ताईनगर येथील भाऊराज महाराज यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. यावेळी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले आहे. रथोत्सवाला शहर तथा परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी, असे आवाहन देवस्थानचे गादीपती प्रवीणदास महाराज व मिथीलेश महाराज यांनी केले आहे.
कीर्तन महोत्सवाला सुरुवात
पांडुरंग रथोत्सवानिमित्त ि11 पासून कीर्तन महोत्सवाला सुद्धा सुरुवात झाली आहे. 13 रोजी महंत योगी दत्त नाथ महाराज (शिंदखेडा) यांचे तर 14 रोजी पोपट महाराज (कासारखेडा) यांचे जाहीर कीर्तन रात्री 8 ते 10 वाजेच्या दरम्यान होईल.