मध्यप्रदेशातील तरुण गावठी पिस्टल व चार जिवंत काडतूसासह जाळ्यात
धुळे स्थानिक गुन्हे शाखेसह नरडाणा पोलिसांची कारवाई : नरडाणा पोलिसात संशयीताविरोधात गुन्हा
धुळे (14 नोव्हेंबर 2024) : धुळे स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील संशयीताला गावठी पिस्टल व चार जिवंत काडतूसासह अटक केली आहे. अशोक मिला बैसाणे (34, रा.सकराली बुजुर्ग, ता.पानसेमल, जि.बडवाणी, मध्यप्रदेश) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात नरडाणा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
गोपनीय माहितीवरून कारावई
विधानसभा निवडूणकीच्या पार्श्वभुमीवर गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक श्रीराम पवार यांना संशयीत गावठी पिस्टलासह दुचाकीवरून येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकासह नरडाणा पोलिसांना निर्देश दिले. बेटावद चौफुलीवर सापळा रचल्यानंतर शिरपूर-नरडाणा रस्त्यावर विना क्रमांकाची हिरो कंपनीची एच.एफ. डिलक्स दुचाकीवरून आलेल्या संशयीताला अडवल्यानंतर त्याच्या बॅगेची झडती घेतली असता त्यात गावठी पिस्टल, चार जिवंत काडतूस आढळल्याने जप्त करण्यात आले. 12 रोजी रात्री ही कारवाई संयुक्तरित्या करण्यात आली. 20 हजार रुपये किंमतीच्या दुचाकीसह 25 हजारांचा कट्टा व चार हजारांची जिवंत काडतूसे मिळून 49 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार पवन गावळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली तपास विजय आहेर करीत आहेत.
यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, शिरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, एपीआय श्रीकृष्ण गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली नरडाणा पोलीस ठाण्याचे एपीआय निलेश मोरे, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पाटील, मनोज कुवर, विजय आहरे, आरीफ पठाण, पवन गवळी, संदीप पाटील, ललीत पाटील, मयुर पाटील, गजेंद्र पावरा आदींच्या पथकाने केली.