विधानसभा निवडणूक : सोशल मिडीया, इलेक्ट्रॉनिक मीडियावरचा प्रचारही उद्या सायंकाळी सहा वाजता होणार बंद !


जळगाव (17 नोव्हेंबर 2024) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. सोमवार, 18 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजेपासून प्रचार बंद होईल. उमेदवारांना इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मिडीया, इलेक्ट्रॉनिक मीडियारून जाहिराती, प्रचार करता येणार नाही. यावर निवडणूक यंत्रणेचे लक्ष असून कोणीही निवडणूक आयोगाचा नियमाचा भंग करू नये, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

वर्तमानपत्रात पूर्व प्रमाणिकरण करून जाहिरात देता येणार
वर्तमानपत्रात 19 आणि 20 नोव्हेंबर रोजी भारत निवडणूक आयोगाने राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण करण्याचे निर्देश दिले आहे. मतदानाच्या दिवशी व मतदानाच्या एक दिवसापूर्वी प्रिंट माध्यमांमधून कोणत्याही भडकाऊ, दिशाभूल करणार्‍या किंवा द्वेषपूर्ण जाहिरातींमुळे कोणतीही अप्रिय घटना घडू नये, ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेला खीळ बसले अशा जाहिराती प्रकाशित होऊ नये, याबाबत दक्षता घेण्याच्या सुचना निवडणुक आयोगाकडून देण्यात आल्या आहेत.

एमसीएमसी समितीकडे करावा अर्ज
कोणताही राजकीय पक्ष किंवा निवडणूक उमेदवार किंवा इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती यांनी महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूका, 2024 मतदानाच्या दिवशी म्हणजेच 20 नोव्हेंबर आणि मतदानाच्या एक दिवस आधी 19 नोव्हेंबर रोजी वर्तमानपत्रात द्यायची जाहिरात जोपर्यंत राज्य/जिल्हा स्तरावरील माध्यम पूर्व प्रमाणिकरण समितीकडून पूर्व-प्रमाणित केली जात नाही, तोपर्यंत वृत्तपत्रात प्रकाशीत करू नये तसेच राजकीय पक्ष किंवा निवडणूक उमेदवार किंवा इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती यांना उक्त कालावधीत वर्तमानपत्रात राजकीय जाहिरात द्यावयाची झाल्यास, अर्जदारांनी सदर जाहिरात प्रकाशित करण्याच्या प्रस्तावीत तारखेच्या दोन दिवस आधी एमसीएमसी समितीकडे अर्ज करावा लागेल, अशा सूचना देण्यात आल्या आहेत, त्याचे पालन करावे असे आवाहनही जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी केले आहे.


कॉपी करू नका.