भुसावळात निवडणूक काळात 90 उपद्रवींना शहरबंदी
भुसावळ (19 नोव्हेंबर 2024) : विधानसभा निवडणूक शांततेत पार पडण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे उपद्रवींच्या शहर बंदीचा प्रस्ताव अपर पोलीास अधीक्षक यांच्याकडे पाठवण्यात आला होता. त्यावर निर्णय होऊन 90 जणांना 17 ते 24 नोव्हेबर या काळात शहरबंदीचे आदेश अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी काढले आहे. या सर्व उपद्रवींना पोलीस प्रशासनाकडून नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत.
दोन तासांसाठी मतदान मुभा
शहर पोलीस ठाणे 22, बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीतील 68 असे 90 उपद्रवींना दि. 17 ते 24 या काळात बंदी राहणार आहे. मतदानाच्या दिवशी या उपद्रवींना दोन तासांसाठी मतदान करण्यासाठी शहरात येता येणार आहे, त्यानंतर त्यांनी पुन्हा निघून जायचे आहे. निवडणुका शांततेत पार पडाव्यात यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. डीवायएसपी कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक उध्दव डमाळे, बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल वाघ यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील उपद्रवींविरूध्द शहरबंदी प्रस्ताव तयार करून पाठविले होते. त्यावर रविवारी निर्णय होऊन संबंधितांना तात्पुरत्या स्वरूपात शहरबंदीचे आदेश काढले आहे. तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन जणांच्या हद्दपारीचे आदेश प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांनी काढले आहे.
आदेशाची अंमलबजावणी
अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी काढलेले आदेश पोलीस प्रशासनाकडून संबंधितांना बजाविण्यात आले. त्यांना शहर सोडून जाण्याच्या सूचना करण्यात आहेत. मतदानाच्या दिवशी दोन तास येऊन मतदान करून पुन्हा शहर सोडून जायचे आहे. मतदानाच्या दिवशी काही जणांना स्थानबध्द करण्याचे नियोजन पोलीस प्रशासनाचे आहे. कारवाईकडे लक्ष लागून आहे.