भुसावळातील राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून महिनाभरात 65 गुन्हे दाखल
अवैध हातभट्टी, ढाब्यांवर कारवाई : 21 लाखांचा मुद्देमाल जप्त
भुसावळ (19 नोव्हेंबर 2024) : विधानसभा निवडणुकीच्या काळात होणारी अवैध दारू विक्री आणि महामार्गावरील ढाब्यांवर अनधिकृतरित्या विक्री होणार्या दारूविरूध्द राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी, कर्मचार्यांनी छापे टाकून महिनाभरात 65 केसेस दाखल केल्या व 21 लाख 28 हजार 310 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईने अवैध विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
महिनाभरात 65 केसेस दाखल
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ.व्ही.टी.भुकन यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय निरीक्षक सुजीत कपाटे, दुय्यम निरीक्षक आर.डी.सोनवणे, आय.बी.बाविस्कर, अजय गावंडे आदी कर्मचारी असलेल्या पथकाने भुसावळ, मुक्ताईनगर, रावेर, बोदवड, वरणगाव, सावदा, निंभोरा येथे अवैधरित्या विक्री होत असलेल्या दारूच्या ठिकाणांवर छापे मारीत धडक कारवाई केली. यावेळी पथकाने रात्रीच्या वेळी तापी पूर्णा क्षेत्रात बेटावर असलेल्या हातभट्टी केद्रावर पथकातील अधिकारी, कर्मचारी यांनी होडीने जात दारूच्या हातभट्टी उद्ध्वस्त केल्या. सीमा तपासणी नाक्यावर सुध्दा 24 तास तपासणी केली जात आहे.
दररोज 500 वाहनांची तपासणी केली जाते. यात चोरवड, पूर्णाड, पाल येथे ही पथके नियुक्त केली आहे. दारू बंदी विभागाच्या अधिकार्यांनी 65 केसेस केल्यात. यात त्यांनी 61 जणांना अटक केली आहे. कारवाई करणार्या पथकाने 21 लाख 28 हजार 310 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई महिन्याभरात केली आहे. यामुळे अवैध विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.