त्या ऑडीओ क्लीपमधील आवाज माझा नाहीच : सुप्रिया सुळे
पुणे (बुधवार, 20 नोव्हेंबर 2024) : माझा आणि त्या ऑडिओ क्लिपचा काहीही संबंध नाही, तो आवाज माझा नाही, कुणीही चेक करावे, असे आव्हानच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देत त्यांच्यावरील आरोप फेटाळले आहे.
काय घडले नेमके?
राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा बिटकॉइन घोटाळ्यात सहभाग असल्याचा आरोप माजी आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांनी केला. यावरून भाजपने महाविकास आघाडीवर टीका करत सवाल उपस्थित केला आहे. सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांचा बिटकॉईन घोटाळ्यात सहभाग आहे की नाही, हे त्यांनी स्पष्ट करावे, अशी मागणी भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी मंगळवारी रात्री पत्रकार परिषदेत केली.
सुळेंसह पटोलेंवर आरोप
विधानसभा निवडणुकीपूर्वी उघडकीस आलेल्या भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांच्या पैसे वाटप प्रकरणात निर्माण झालेला राजकीय गोंधळ थांबत नाही तोच आता बिटकॉईनचा वाद समोर आला आहे. बिटकॉइनच्या माध्यमातून निवडणुकीला निधी दिला जात असल्याचा आरोप माजी आयपीएस रवींद्रनाथ पाटील यांनी केला. यामध्ये बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत.
वेळ, जागा त्यांनी ठरवावी, आपण चर्चेला तयार : सुप्रिया सुळे
सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, त्रिवेदी काल म्हणाले की सुप्रिया सुळेंनी बाहेर येऊन दाखवावे, मी काल रात्रीच बाहेर आले. आज तुमच्या माध्यमातून मी विनम्रपणे विनंती करते की, त्रिवेदीजी म्हणतील ती वेळ, जागा, चॅनल, शहरात येऊन मी मनमोकळेपणाने त्यांना किंवा त्यांच्या पक्षाच्या नेत्यासोबत चर्चा करेल.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, रवींद्र पाटील हे एक आयपीएस अधिकारी आहेत. ते दोन वर्षे जेलमध्ये राहून आले आहेत. त्यांनी माझ्यावर खोटे आरोप केले आहेत. त्यांच्याविरोधात मी सायबर क्राईममध्ये तक्रार दाखल केली आहे. पुण्याच्या पोलिस आयुक्तांशी मी यावर चर्चा केली आहे. बिटकॉनविरोधी जर संसदेत कोणी सर्वाधिक बोलले असेल तर मी बोलले आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.