जळगावात जुना वाद उफाळल्यानंतर बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू
जळगाव (बुधवार, 20 नोव्हेंबर 2024) : शहरातील राजमालती नगरात बुधवारी, 20 नोव्हेंबर रोजी पहाटे सहा वाजता जुन्या वादामुळे दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीत 36 वर्षीय सिद्धार्थ माणिक वानखेडे या तरुणाचा मृत्यू झाला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजमालती नगर परिसरात सिद्धार्थ व त्याच्या विरोधी गटातील लोकांमध्ये जुना वाद सुरू होता. बुधवारी सकाळी 9 वाजता त्याच वादाच्या पार्श्वभूमीवर आठ ते दहा जणांनी सिद्धार्थ वानखेडे याला छातीवर लाथा आणि बुक्क्यांनी बेदम मारहाण केली, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला.
या घटनेत विशाल अजय सुरवाडे (28), जानू संजू पाटील (20), फैजन राजू पाटील (24), आणि मेहमूद हाजी बिस्मिल्ला पटेल (वय 42) यांसारखे आणखी चार जण जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
शहर पोलिसांनी या प्रकरणी सात ते आठ जणांना ताब्यात घेतले असून, पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी या घटनेबाबत माहिती दिली.