रेल्वे संपत्तीचे रक्षण, प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देणार : भुसावळ आरपीएफचे नूतन वरिष्ठ आयुक्त चित्रेश जोशी
भुसावळ (20 नोव्हेंबर 2024) : रेल्वे संपत्तीचे रक्षण करण्यासोबतच प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यावर भर राहणार आहे. प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी प्रयत्न केले जातील, अशी माहिती रेल्वे सुरक्षा बलाचे नूतन वरिष्ठ आयुक्त चित्रेश जोशी यांनी दिली.
रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य
जोशी हे दिल्लीहून बदलून आले, त्यांनी सोमवारी आपल्या पदाचा पदभार घेतला. रेल्वे सुरक्षा बलाचे वरिष्ठ आयुक्त पद गेल्या चार महिन्यांपासून रिक्त होते. या रिक्त पदावर दिल्ली येथील चित्रेश जोशी यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. जोशी यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, रेल्वे सुरक्षा बलाचे प्राधान्य हे रेल्वे संपत्तीचे रक्षण करणे, प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यावर आहे. संपूर्ण विभागाची पाहणी करणार असून रेल्वे सुरक्षा बलाच्या माध्यमातून जास्तीत-जास्त चांगले काम करण्यावर भर राहणार आहे. भुसावळ विभागातील विविध रेल्वे स्थानकांची पाहणी करून तेथील कामाचा आढावा घेतला जाईल, असेही ते म्हणाले.