महाराष्ट्रात 288 जागांसाठी 58 टक्के मतदान : सहा एक्झीट पोलचा महायुतीकडे तर चौघांचा महाविकास आघाडीला कल
मुंबई (बुधवार, 20 नोव्हेंबर 2024) : राज्यात काही घटनांचा अपवाद वगळता शांततेत मतदान झाले. महाराष्ट्रातील विधानसभेच्या 288 जागांसाठी सायंकाळी पाच वाजेपर्यंत 58.22 टक्के मतदान झाले. गडचिरोलीत सर्वाधिक 69.63 तर मुंबई सिटीत सर्वात कमी 49.07 टक्के मतदान झाले. दरम्यान, जनतेला आता येत्या शनिवार, 23 नोव्हेंबर रोजी जाहीर होणार्या निकालाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, 11 पैकी सहा एक्झीट पोलनुसार राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येण्याची शक्यता आहे तर चौघा एक्झीट पोलनुसार महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येवू शकते.
दैनिक भास्करच्या एक्झिट पोलनुसार महाविकास आघाडीला 135 ते 150 जागा मिळण्याचा अंदाज आहे. सरकार स्थापनेसाठी 145 बहुमताचा आकडा आहे. मविआ बहुमताचा आकडा पार करताना दिसत आहे.
भास्करच्या एक्झिट पोलनुसार, सत्ताधारी महायुतीला 125 ते 140 जागा मिळू शकतात. महायुतीनं एक्झिट पोलच्या अंदाजाप्रमाणे कमाल जागा जरी मिळवल्या, तरीही ते बहुमतापासून दूर राहतील. अन्य पक्ष आणि अपक्षांना 20 ते 25 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. जनकल्याणकारी योजनांचा परिणाम मतदानावर झालेला आहे. पण स्थानिक मुद्दे सर्वात कळीचे ठरलेले आहेत. शहरी भागांपेक्षा ग्रामीण भागांत अधिक मतदान झालेलं आहे, असं एक्झिट पोल सांगतो.
भाजपला 80 ते 90, शिवसेनेला 30 ते 35 आणि राष्ट्रवादीला 15 ते 20 जागा मिळण्याचा अंदाज भास्करच्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलेला आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस मोठा भाऊ ठरण्याची शक्यता आहे. काँग्रेसला 58 ते 60, राष्ट्रवादीला 50 ते 55 आणि शिवसेना उबाठाला 30 ते 35 जागा मिळतील असा कयास आहे. राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 2 ते 4 जागा मिळण्याचा अंदाज आहे.