जळगावातील गॅस स्फोटातील मृतांची संख्या सातवर : ‘त्या’ तरुणीचाही मृत्यू


जळगाव : अवैधरित्या वाहनात गॅस रिफिलिंग करताना टाकीचा स्फोट होऊन जळगावात वाहन पेटून 11 जण जखमी झाले होते शिवाय वाहन जळून खाक झाल्याची घटना ईच्छादेवी पोलीस चौकीजवळ घडली होती. या दुर्घटनेत आतापर्यंत सहा जणांचा उपचारादरम्यान बळी गेल्यानंतर 23 वर्षीय तरुणीचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. रश्मी संजय तेरवडीया (दालवाला, 23, रा.गणेश पेठ, पुणे) असे मयताचे नाव आहे. स्फोटाची घटना मंगळवार, 5 रोजी नोव्हेंबरला घडली होती. दालवाला परिवारातील पाच जण दगावल्याने त्यांच्या परिवारात शोककळा पसरली आहे.

ग्रह शांतीसाठी निघाल्यानंतर दुर्घटना
रश्मी तेरवडीया या एका खासगी कंपनीत नोकरीस होत्या. त्यांच्या कुटुंबियांना अनेक अडचणी येत असल्याने संजय तेरवडीया यांनी ग्रहशांती करण्यासाठी नातेवाईकांसह जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी अमळनेर येथे धार्मीक विधी करण्यासाठी तेरवडीया व दालवाले कुटुंबिय हे मंगळग्रह मंदिरात जाण्यासाठी जळगावात आले होते.

संजय तेरवडीया यांचा मुलगा राहुल हा देखील कुटुंबियांसोबत मंगळग्रह मंदिरात दर्शनासाठी येणार होता मात्र त्याला सुटी मंजूर न झाल्यामुळे त्याचे येणे अचानक रद्द झाले होते. त्यामुळे आई-वडीलांसह बहिण हे तिघेच आल्यामुळे राहुल हा या अपघातातून बचावला. वडिलांसह बहिणीचा मृत्यू झाल्यामुळे राहुलसह त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पुण्यातील गणेश पेठमध्ये राहणारे संजय तेरवडीया हे पत्नी, मुलगी व मुलासह वास्तव्यास होते. दिवाळीनिमित्त पत्नीसह मुलीला घेवून ते जळगावात राहणारे त्यांचे साडू भरत दालवाले यांच्याकडे आले हाते. याठिकाणी आल्यानंतर ते अमळनेर येथील मंगळग्रह मंदिरात दर्शनाला जाण्यासाठी त्यांनी संदीप शेजवळ यांचे वाहन भाड्याने घेतले होते.

वाहन चालकाने ईच्छादेवी चौकी पोलीस चौकशीशेजारील रिफीलींग सेंटवर वाहनात गॅस रिफिलींग करीत असतांना गॅस सिलींडरचा स्फोट होवून तेरवडीया यांच्या कुटुंबातील तिघे, दालवाले कुटुंबातील चौघांसह गॅस भरणारा, वाहन चालक व पोलीस कर्मचारी हे गंभीररित्या भाजले गेले होते. यातील सात जणांचा उपचार सुरू असतांना मृत्यू ओढवला तर इतर जखमींवर उपचार सुरु आहेत.


कॉपी करू नका.