मुक्ताईनगर मतदारसंघात 70.71 टक्क्यांवर मतदान ; लाडक्या बहिणींचा कौल 23 रोजी कळणार
मुक्ताईनगर (गुरुवार, 21 नोव्हेंबर 2024) : विधानसभा मतदारसंघासाठी सर्वाधिक चुरस असलेल्या मतदारसंघात बुधवार, 20 रोजी 70.71 टक्के मतदान झाले. माजी महसूल मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांच्या कन्या व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार अॅड.रोहिणी खडसे व विद्यमान आमदार तसेच शिंदे गटाचे महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्यात खरी लढत झाली. लाडक्या बहिणींनी केलेल्या उत्स्फूर्त मतदानाचा कौल कुणाकडे याची स्पष्टता 23 नोव्हेंबरच्या निकालाअंती स्पष्ट होणार आहे.
70.71 टक्के मतदान
बुधवारी सकाळी पहिल्या दोन तासात सकाळी नऊ वाजे पर्यंत 6.5 टक्के तर 11 वाजेपर्यंत 16.17 टक्के तर दुपारी एक वाजेपर्यंत 32 टक्के मतदान झाले . तीन वाजेपर्यंत 42.51 टक्के व सायंकाळी पाच वाजेपर्यंत हा आकडा 59.69 टक्क्यांवर पोहोचला तर सायंकाळी सहा वाजेनंतर 70.71 टक्के मतदान झाल्याचे प्रशासनाने कळवले आहे. तीन लाख चार हजार 64 पैकी दोन लाख 15 हजार 11 मतदारांनी आपला हक्क बजावला. सायंकाळी उशिरापर्यंत काही केंद्रावर रांगा दिसून आल्या.
तीन लाख चार हजार मतदार
मतदारसंघात एक लाख 55 हजार 378 पुरूष तर एक लाख 48 हजार 679 स्त्री व आठ तृतीयपंथी मिळून तीन लाख चार हजार 64 मतदार आहेत. बुधवारी झालेल्या निवडणुकीसाठी तालुक्यात एकूण 322 मतदान केंद्रावर मतदान झाले. तीन केंद्रावर महिलाराज राहिले तर पाच केंद्र हे आदर्श व एक केंद्र युवा मतदान केंद्र तसेच दोन केंद्र दिव्यांसाठी होते. निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षक श्रीमती स्मिताक्षी बरुवा, निवडणूक निर्णय अधिकारी जमदाडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. पोलीस उपअधीक्षक राजकुमार शिंदे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक नागेश मोहिते व सहकार्यांनी चोख बंदोबस्त राखला.
उमेदवारांनी बजावला हक्क
बुधवारी सकाळी सव्वा नऊच्या सुमारास खडसें कुटुंबीयांनी सहकुटुंब मतदान केले. माजी मंत्री एकनाथ खडसे, राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाच्या उमेदवार रोहिणी खडसे व मंदाकिनी खडसे यांनी कोथळी येथील मराठी शाळेत मतदान केले तर महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यानी मुक्ताईनगर जुनेगाव भागातील जि.प.मराठी शाळेत पत्नी यामिनी पाटील, मुलगी प्रियंका पाटील, संजना पाटील, मुलगा हर्षराज पाटील यांच्यासह मतदान केले.
सकाळी निरुत्साह मात्र दुपारनंतर रांगा
बुधवारी सकाळी सात वाजेपासून मतदानाला प्रारंभ झाला. तत्पूर्वी मोकपॉल घेण्यात आला. मतदान यंत्र वेळेवर कार्यान्वित झाले होते. सकाळपासून संथ गतीने सुरवात झालेल्या मतदानाला दुपारी गती मिळाली. ग्रामीण भागात सकाळी तर शहरी भागात सायंकाळीं मतदारांची गर्दी आणि रांगा पाहायला मिळाल्या.