भुसावळातील खडका रोड भागात सकाळपासून मतदारांच्या रांगा : 57.75 टक्के मतदान
सकाळी निरुत्साह ; दुपार व सायंकाळनंतर मतदानाची वाढली टक्केवारी
भुसावळ (गुरुवार, 21 नोव्हेंबर 2024) : लोकशाहीच्या मोठ्या उत्सवात अर्थात विधानसभा निवडणुकीसाठी शहर व ग्रामीण भागातील मतदारांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत आपला हक्क बजावला. भुसावळ विधानसभा निवडणुकीसाठी बुधवार, 20 रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहादरम्यान 57.57 टक्के मतदारांनी हक्क बजावला. तीन लाख 16 हजार 307 पैकी 12 तृतीयपंथीयांसह एक लाख 82 हजार 683 मतदारांनी हक्क बजावला. एरव्ही मुस्लीम बहुल भागात सकाळच्या वेळी मतदानाचा आकडा अल्प असलातरी लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेतही या भागात महिला व पुरूष मतदारांनी सकाळी सात वाजेपासूनच उत्स्फूर्तपणे बाहेर पडत हक्क बजावला.
तांत्रिक अडचणीनंतर 20 मिनिटात मतदान पूर्ववत
दरम्यान, शहरातील जळगाव रोडवरील नगरपालिका शाळा क्रमांक 29 मधील केंद्र क्रमांक 53 वर व्हीव्हीपॅटमध्ये अडचण निर्माण होताच तातडीने दुसरे मशीन लावण्यात आल्याने 20 मिनिटात मतदान प्रक्रिया सुरळीत झाली.
मुस्लीम बहुल भागात उत्स्फूर्त मतदान
भुसावळातील खडका रोडवरील अंजुमन उर्दू हायस्कूलला भेट दिल्यानंतर सकाळी सात ते 11 दरम्यान 186 पुरूष तर 167 पुरूषांनी हक्क बजावला व 32 टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात आले. शहरातील एम.आय.तेली उर्दू स्कूलला भेट दिल्यानंतर केंद्र क्रमांक 91 मध्ये पहिल्या चार तासात अर्थात सकाळी सात ते 11 दरम्यान 26.75 टक्के, केंद्र क्रमांक 90 मध्ये सकाळी 11 वाजेपर्यंत 253 मतदारांनी हक्क बजावला तर केंद्र क्रमांक 73 मध्ये 15.5 टक्के, केंद्र क्रमांक 118 मध्ये 19.46 टक्के, केंद्र क्रमांक 92 मध्ये 22 टक्के, केंद्र क्रमांक 93 मध्ये 19.41 टक्के, केंद्र क्रमांक 94 मध्ये 17.42 टक्के केंद्र क्रमांक 119 मध्ये 18.78 टक्के मतदान झाल्याचे सूत्रांनी सांगितले. उसामा उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमधील केंद्र क्रमांक 123 मध्ये 20.21 टक्के तर 124 मध्ये 23.21 टक्के मतदारांनी हक्क बजावला.
प.क.कोटेचात ‘महिलाराज’
भुसावळ विधानसभेतील 318 पैकी 11 मतदान केंद्र आदर्श म्हणून जाहीर करण्यात आली होती तर त्यातील तीन केंद्रावर महिलाराज अर्थात सर्वच अधिकारी म्हणून महिलांची नियुक्ती करण्यात आली. त्यात शहरातील श्रीमती प.क.कोटेचा महाविद्यालय, एन.के.नारखेडे, पत्री शाळा व गोजेारे येथील जिल्हा परिषदेची शाळेची निवड करण्यात आली. प.क.कोटेचातील केंद्र क्रमांक 9 मध्ये 40 टक्के, केंद्र क्रमांक 10 मध्ये 41 टक्के, केंद्र क्रमांक 13 व 14 मध्ये 40 टक्के, केंद्र क्रमांक 15 मध्ये 42 टक्के, केंद्र क्रमांक 16 मध्ये 44 टक्के,
केंद्र क्रमांक 17 मध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 38.04 टक्के मतदान झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
सेल्फी काढण्यासाठी वाढली गर्दी
दिव्यांग मतदारांसाठी पु.गं.बर्हाटे व पालिकेची शाळा नंबर 35 ही स्वतंत्र मतदान केंद्रे होती तर 25 वयोगटाच्या आतील अधिकारी असलेले युवा मतदान केंद्र म्हणून के.नारखेडे विद्यालय होते शिवाय ग्रामीण भागात भानखेडा जिल्हा परिषद शाळा, जाडगाव, टहाकळी, किन्ही व आदर्श हायस्कूल, भुसावळ ही आदर्श केंद्र प्रशासनाने जाहीर केली होती. भुसावळातील श्रीमती प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात सेल्फि पॉईंट तयार करण्यात आल्याने मतदारांनी मतदानानंतर सेल्फी काढण्याचा आनंद घेतला.
आबालवृद्धांचा उत्साह ओसंडला
लोकसभा निवडणुकीप्रमाणेच मुस्लीम भागातील मतदान केंद्रावर भल्या सकाळी सात वाजेपासून न भूतो न भविष्यती अशी मुस्लीम महिला व पुरूष मतदारांची गर्दी दिसून आली. आबालवृद्धांसह नवतरुण मतदारांचा उत्साहदेखील शिगेला पोहोचल्याचे दिसून आले. अत्यंत शिस्तीत व रांगेत मतदारा या केंद्रांवर सकाळी सात वाजेपासून रांगा लावून होते.
प्रशासनाकडून सुविधा : मतदारांमध्ये समाधान
निवडणूक प्रशासनाकडून विधानसभा निवडणुकीत मतदारांसाठी मतदान केंद्रावर आरोग्याच्या सुविधा, पिण्यासाठी शुद्ध पाणी तसेच दिव्यांगांसाठी रॅम्पसह व्हिल चेअरची व्यवस्था करण्यात आल्याने मतदारांमधून समाधान व्यक्त करण्यात आले. मतदारांना दुपारच्या वेळेच उन्हाची झळ न बसण्यासाठी प्रशासनाकडून मंडपाचीदेखील व्यवस्था करण्यात आल्याचे यावेळी दिसून आले.
मतदार यादीत नावे न सापडल्याने मतदार माघारी
लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही अनेक मतदारांची नावे मतदार यादीत न सापडल्याने मतदारांना आल्या आपली माघारी फिरावे लागले तर अनेक भागातील बीएलओ यांच्याकडून मतदारांना स्लीप वाटप झाल्या नसल्याच्या तक्रारी मतदारांनी केल्या. निवडणूक विभागाकडून मतदारांच्या घरांपर्यंत स्लीप पोहोचवण्याचे आदेश बीएलओ यांना देण्यात आले असलेतरी अनेक भागातील बीएलओ यांनी कामात हलगर्जीपणा केल्याचा आरोप मतदार यावेळी करताना दिसून आले.
मॉक पॉलमध्ये ईव्हीएम तर तांत्रिक अडचण येताच व्हीव्हीपॅट बदलले
विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास यंत्रणेने मॉक पॉल (मतदान सुरू होण्यापूर्वीची चाचणी) घेतला मात्र त्यावेळी तीन ते चार ठिकाणी मशीनमध्ये अडचण येताच तातडीने तेथील ईव्हीएम बदलण्यात आल्याची माहिती तहसीलदार निता लबडे यांनी दिली तसेच जळगाव रोडवरील नगरपालिका शाळा क्रमांक 29 मधील केंद्र क्रमांक 53 वर व्हीव्हीपॅटमध्ये अडचण निर्माण होताच काही वेळेनंतर दुसरे मशीन लावण्यात आल्याने मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाली.