रावेर विधानसभा मतदारसंघात जिल्ह्यात सर्वाधिक 73.84 टक्के मतदान : मतदारांचा अपूर्व उत्साह
आता 23 नोव्हेंबरच्या निकालाकडे लक्ष : प्रमुख पक्षांसह प्रहार उमेदवाराचा विजयाचा दावा
रावेर (गुरुवार, 21 नोव्हेंबर 2024) : रावेर विधानसभा मतदार संघासाठी बुधवारी अत्यंत उत्स्फूर्तपणे मतदान झाले. सकाळपासून मतदारांमध्ये मतदानाचा उत्साह असलातरी दुपारनंतर मात्र मतदारांची मतदान केंद्रावर गर्दी वाढली लागली. अनेक केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र होते. नागरीकांनी मोठ्या उत्साहात मतदान केले. मतदारसंघातील नऊ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. लाडक्या बहिणींसह मतदारांचा कल कुणाकडे ? हे आता शनिवार, 23 रोजीच्या निकालानंतर कळणार आहे. निवडणूक विभागाच्या माहितीनुसार, सायंकाळी सहा वाजेपर्यंत तीन लाख दोन तृतीयपंथीयांसह पाच हजार 936 पैकी दोन लाख 28 हजार 573 मतदारांनी मतदान केले. जिल्ह्यातील 11 मतदारसंघापैकी सर्वाधिक मतदान 73.84 रावेर मतदारसंघात झाले हे विशेष !
रिक्षाने आले मतदार
बुधवारी सकाळी सात वाजेपासून रावेर विधानसभा मतदार संघांतर्गत 328 मतदान केंद्रावर मतदानास सुरूवात झाली. सकाळी सात वाजेपासून रावेर शहरासह मतदारसंघात काही मतदान केंद्रावर संथगतीने मतदान सुरू झाले.
सकाळी 10 मतदार वाजेनंतर मतदानाचा वेग वाढला. दुपारच्या टप्प्यात पुन्हा मतदान मंदगतीने सुरू होते. दुपारनंतर मोठ्या संख्येने घराबाहेर मतदार निघाल्याने मतदानाची टक्केवारी वाढली. मतदार दुपारी रिक्षाने येत होते तर काही आपल्या वाहनाने येत होते. मतदारसंघ उत्साह संचारला आणि मतदार मोठ्या संख्येने घराबाहेर पडले त्यामुळे जवळ सर्वच मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
निवडणूक निर्णय अधिकारी बबनराव काकडे, तहसीलदार बी.ए.कापसे, यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल आणि सहकार्यांनी चोख बंदोबस्त ठेवला. मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.
उमेदवारांनी बजावला मतदान हक्क
भालोद येथे भारतीय जनता पक्षाचे रावेर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार अमोल जावळे, पत्नी जयश्री जावळे, आई कल्पना जावळे आणि बहिण पल्लवी पाटील यांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. आमदार शिरीष चौधरी व काँग्रेसचे उमेदवार धनंजय चौधरी यांनी खिरोदा गावी मतदान केले. प्रहार संघटनेचे प्रहार जनशक्ती जनशक्ती पक्षाचे उमेदवार अनिल चौधरी यांनी रावेरात मतदानाचा हक्क बजावला.
असे झाले मतदान
सकाळी 7 ते 9 दरम्यान 28 हजार 646 मतदारांनी हक्क बजावला तर 8.28 टक्के मतदान झाले. 11 वाजेपर्यंत एकूण 63 हजार 497 मतदारांनी हक्क बजावला व 20.51 टक्के मतदान झाले. दुपारी एक वाजता एक लाख सहा हजार 827 मतदारांनी मतदान केल्याने 34.51 टक्के मतदान झाले. दुपारी तीन वाजेपर्यंत एक लाख 53 हजार 678 मतदाराने हक्क बजावल्याने 49.65 टक्के मतदान झाले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत दोन लाख चार हजार 886 मतदाराने हक्क बजावल्याने 66.19 टक्के मतदान झाले तर सायंकाळी सहा वाजपेर्यंत 73.84 टक्के मतदान झाले.