रावेर विधानसभा निवडणूक : मोठे वाघोदासह सावद्यात उशिरापर्यंत मतदारांच्या रांगा


सावदा (21 नोव्हेंबर 2024) : विधानसभा निवडणुकीसाठी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली मात्र पाण्याअभावी मतदारांची गैरसोय झाली तर साळी बागेजवळील संथगतीने सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेमुळेदेखील मतदारांनी नाराजी व्यक्त केली व रात्री उशिरापर्यंत येथे मतदान प्रक्रिया सुरूच होती. सावदा येथे 23 बुथवर मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी मतदानास अत्यल्प प्रतिसाद होता मात्र दुपारी 2.30 पर्यंत सुमारे 45 टक्के मतदान झाले तर दुपारी 3.30 वाजेनंतर मतदानासाठी रांगा लागल्याचे चित्र होते.

रात्री उशिरापर्यंत लागल्या रांगा
सावद्यातील साळी बागेजवळील उर्दू शाळेत असलेल्या मतदान केंद्रावर एकूण चार बुथपैकी 28 क्रमांकाच्या केंद्रावरील मतदान मशीन अत्यंत धीमे चालत असल्याची तक्रार मतदारांनी केली. धीम्या गतीने मतदान सुरू असल्याने मतदारांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली व रात्री उशिरापर्यंत या मतदान केंद्रावर रांगा कायम होत्या. पिण्याचे पाणी संपल्यानंतरही नवीन पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्यात आले नाही. ही बाब काही स्वयंसेवी संस्थांना कळताच त्यांनी पाणी उपलब्ध करून दिले.

मोठ्या वाघोद्यात लागल्या उशिरापर्यंत रांगा
मोठा वाघोदा, ता.रावेर : गावातील बुथ क्रमांक 10 वर सायंकाळी सात वाजेनंतरही शेकडो मतदारांच्या रांगा कायम होत्या. गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी बंदोबस्तात असलेल्या होमगार्ड सुकदेव दयाराम धनगर हे जखमी झाले. त्यांना गावात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी डॉ.खाचणे यांच्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.

दुपारी चारपर्यंत शुकशुकाट असलातरी मजूर वर्ग कामावरून परतताच अचानक मतदारांची गर्दी झाली. गर्दीमुळे बरेच मतदार माघारी फिरले. बुथवर एकूण एक हजार 347 मतदार संख्या असल्याने रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू होते. यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.


कॉपी करू नका.