अकोल्यात 45 हजारांच्या आरक्षित रेल्वे तिकीटांसह दलाल जाळ्यात

अकोला रेल्वे सुरक्षा बलाच्या कारवाईने खळबळ : अधिकृत संकेत स्थळावरून तिकीट काढण्याचे आवाहन


भुसावळ (21 नोव्हेंबर 2024) : रेल्वे आरक्षित तिकीटांचा काळा बाजार केल्याच्या संशयातून अकोला रेल्वे सुरक्षा बलाने सुहास भास्करराव पाटील (46) या संशयीताविरोधात मंगळवार, 19 रोजी कारवाई केली. पंचांसमोर आरोपीच्या आयआरसीटीसी पोर्टलवरील तपासणीदरम्यान 44 हजार 826 रुपये किंमतीची 14 जुनी व एक लाईव्ह ई-रेल आरक्षण तिकिटे जप्त करण्यात आली. अकोल्यातील तपास अधिकारी आर.एल. गुर्जर व आरक्षक संदीप वानखडे यांनी ही कारवाई केली.

शंभर रुपये जादा आकारत विकली तिकीटे
आरोपीकडे एजंट आयडी व वैयक्तिक युजर आयडीविषयी विचारणा करण्यात आली असता, त्याने अधिकृत एजंट आयडी तसेच स्वतःच्या वैयक्तिक युजर आयडीचा वापर केल्याची कबुली दिली. आरोपीच्या ताब्यातून सात हजारांचा मोबाईल जप्त करण्यात आला. आरोपीने स्वतःच्या युजर आयडीच्या माध्यमातून गरजू प्रवाशांसाठी रेल्वे तिकिटे तयार करून प्रत्येकी 100 अतिरिक्त शुल्क आकारल्याचे मान्य केले. आरोपीविरोधात अकोला रेल्वे सुरक्षा बलाने गुन्हा दाखल केला आहे.

अवैध व्यवहाराची द्या माहिती
रेल्वे प्रवाशांनी केवळ अधिकृत वेबसाईट माध्यमांद्वारे तिकिटे बुक करावी तसेच कोणत्याही अवैध व्यवहाराची माहिती तातडीने आरपीएफला द्यावी व रेल्वे प्रशासन प्रवाशांना सुरक्षित व पारदर्शक सेवा देण्यासाठी सदैव कटीबद्ध असल्याचे रेल्वे प्रशासनाने कळवले आहे.


कॉपी करू नका.