भुसावळ शहरात पाच तासात हाती येणार निकाल : मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

ईव्हीएम ठेवलेल्या गोदामाला सीआरपीएफ जवानांचा खडा पहारा : उद्या दुपारी एक वाजेपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता


भुसावळ (22 नोव्हेंबर 2024) : भुसावळातील विधानसभा निवडणुकीसाठी बुधवार, 20 रोजी मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर आता नागरिकांचे लक्ष निवडणूक निकालाकडे लागले आहे. भुसावळ शहरातील तहसील कार्यालयाच्या गोदामात शनिवार, 23 रोजी मतमोजणी होणार असून त्यासाठी प्रशासनाकडून तयारी पूर्ण करण्यात आली आहे. ईव्हीएम ठेवण्यात आलेल्या गोदामाला सशस्त्र जवानांचा 24 तास खडा पहारा असून या परिसरात निवडणूक कामासाठी नियुक्त वरिष्ठ अधिकार्‍यांशिवाय अन्य कुणालाही प्रवेश देण्यास मनाई करण्यात आली आहे. दरम्यान, भुसावळात शनिवारी सकाळी आठ वाजता मततोजणीला सुरूवात होईल तर दुपारी एक वाजेपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता आहे.

पाच तासात येणार हाती निकाल
भुसावळ तहसील कार्यालयाच्या गोदामात शनिवारी सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला सुरूवात होणार आहे. मतमोजणीसाठी एकूण 20 टेबल असतील. त्यात 14 टेबलावर ईव्हीएममधील मतांची मोजणी होईल तर चार टेबलांबवर पोस्टल बॅलेट मतांची मोजणी होईल व एका टेबलावर व्हीव्हीपॅट मशीनमधील चिठ्ठ्यांची मतमोजणी होणार आहे. प्रत्येक टेबलावर अधिकारी व कर्मचारी मिळून पाच जणांची उपस्थिती असेल. त्यात दोन सहाय्यकांचा समावेश असेल. दुपारी एकवाजेपर्यत मतदानाचा निकाल जाहीर होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली.

टपाली मतांची होणार आधी मोजणी
सूत्रांच्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी आठ वाजता सुरूवातीला टपाली मतदानाची मोजणी केली जाईल व त्यानंतर सकाळी 8.30 वाजता मतदान यंत्रातील मतमोजणीला सुरूवात होणार आहे. ही मतमोजणी दुपारी एक वाजेपर्यंत चालण्याची शक्यता असून त्यासाठी 23 फेर्‍या होतील, असे सूत्रांनी सांगितले.

उमेदवारासह नियुक्त प्रतिनिधींनाच प्रवेश
मतमोजणीस्थळी सर्वसामान्य नागरिकांसह अन्य कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही. पक्ष उमेदवार व त्यांच्या नियुक्त प्रतिनिधींनाच मतमोजणीस्थळी प्रवेश दिला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. सर्वसामान्य जनतेला निकालाची माहिती लाऊड स्पीकरद्वारा मिळणार असून राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळा ते पंचमुखी हनुमान मंदिरापर्यत प्रशासनाने उद्घोषणेसाठी लाऊड स्पीकर लावले आहेत. मतमोजणीस्थळी मिडीया कक्षाची उभारणी करण्यात आली असून त्यात जिल्हाधिकार्‍यांमार्फत वितरीत पासेस असलेल्या माध्यम प्रतिनिधींनाच प्रवेश देण्यात येणार आहे.

जळगाव रस्त्यावर केवळ एकेरी जड वाहतूक
भुसावळ तहसील कार्यालयात शनिवार, 23 रोजी मतमोजणीच्या दिवशी गांधी पुतळा ते टेक्निकल हायस्कूलपर्यंतच्या मार्गावर एकेरी वाहतूक करण्यात येणार आहे. येणार्‍या-जाणार्‍या जड वाहनांसाठी ही एकेरी वाहतूक असेल तर हलकी वाहने जीप, कार, रिक्षा आदी टेक्निकल हायस्कूलजवळून सहकार नगर भागातून थेट वाहने यावल रस्त्यावर वळवण्यात आली आहे. मतमोजणी आटोपेपर्यंत एकेरी वाहतूक असणार आहे.

मतमोजणीचे अत्यंत काटेकोर नियोजन
मतमोजणीसह वेळेवर निकाल जाहीर करण्यासाठी प्रशासनाने काटेकोर नियोजन केले आहे. निवडणूक अधिकारी व प्रांताधिकारी जितेंद्र पाटील, सहाय्यक निवडणूक अधिकारी निता लबडे, नायब तहसीलदार अंगद आसटकर, गटविकास अधिकारी सचिन पानझडे व यंत्रणेने यासाठी नियोजन केले आहे.


कॉपी करू नका.