अमोल जावळेंचे वर्चस्व सिद्ध : राजकीय वारसा लाभलेल्या चौधरी कुटूंबाला धक्का
विधानसभा निवडणूक विश्लेषण ः अरविंद देशमुख यांची रणनिती ठरली यशस्वी ; लाडक्या बहिणींची मदत ठरली मोलाची
देवलाल पाटील
Amol Javale’s dominance proven : Shock to the Chaudhary family, which has inherited political power रावेर (26 नोव्हेंबर 2024) : विधानसभा मतदारसंघात सोशल इंजिनिअरिंग, धार्मिक एकत्रीकरण आणि लाडक्या बहिणींच्या एकजुटीमुळे आमदार अमोल हरीभाऊ जावळे यांचा विधानसभेत दणदणीत विजय झाला. सुरुवातीला अतिशय चुरशीची वाटणारी निवडणूक शेवटी एकतर्फी झाली. आमदार शिरीष चौधरी यांच्या विरोधात जनतेत रोष होता म्हणून जनतेने त्यांचे पुत्र धनंजय चौधरी यांच्या विरोधात मतदान करून त्यांना नाकारल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये. रावेर विधानसभेत सर्वात महत्वाचा फॅक्टर म्हणजे जामनेर येथील अरविंद देशमुख यांच्या रणनीतीने विजय मिळवला.
धार्मिक एकत्रीकरणासह रणनिती यशस्वी
काँग्रेसचे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी तब्येतीचे कारण देत त्यांचा मुलगा धनंजय चौधरी यांना उमेदवारी दिली तर भाजपाकडून माजी खासदार स्व.हरीभाऊ जावळे यांचे पुत्र अमोल हरीभाऊ जावळे यांना उमेदवारी मिळाली. मतदारसंघाची सामाजिक स्थिती बघता भाजपा आणि काँग्रेस दोन्ही पक्षांसाठी अनुकूल मतदारसंघ आहे. भाजपाने अमोल जावळे यांना उमेदवारी दिल्यावर मंत्री गिरीष महाजन यांचे निकटवर्तीय मानले जाणारे अरविंद देशमुख यांना रावेर मतदारसंघात सक्रिय केले. त्यांनी पक्षाचे पूर्ण संघटन कामाला लावले होते आणि शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी रणनीती आखली. सोबतच, आरएसएसने धार्मिक एकत्रीकरणावर मोठ्या प्रमाणात भर दिला. सर्वांनी वेगवेगळ्या रणनितीवर काम केल्यामुळे भाजपा उमेदवार अमोल जावळे हे रावेर मतदारसंघात 43 हजार 562 च्या लीडने विजयी झाले.
भाजपचे तालुका संघटन होते ‘ग्राउंडवर’
विधानसभा निवडणुकीत पहिल्या फॅक्टरमध्ये शासनाच्या योजना आणि मतदार आपल्या बाजूने वळवण्यासाठी रणनीती आखण्यात आली. गिरीष महाजन यांचे निकटवर्तीय अरविंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर तालुक्यात पक्षाचे विचार आणि शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी रणनीती ठरवण्यात आली. यात भाजपा ज्येष्ठ पदाधिकारी सुरेश धनके, भाजपा तालुकाध्यक्ष महेश चौधरी, उमाकांत महाजन, प्रल्हाद पाटील (मोरगाव), सुनील पाटील (वाघोड), आणि पद्माकर महाजन (रावेर) यांच्या कुशल रणनितीमुळे भाजपाने आपली टीम ग्राऊंडवर सक्रिय केली आणि त्याच रूपांतरण भाजपा उमेदवार अमोल जावळे यांचा विजयश्री खेचून आणण्यात झाले.
भाजपने सोशल इंजिनिअरिंगभर दिला
पॅरलल टीमद्वारे मराठा समाज भाजपाकडे वळविण्यात महत्त्वाची भूमिका काहींनी बजावली. नव्या दुसर्या फळीतील लोकांपर्यंत ते थेट पोहचले. याचा परिणाम मतदानात झाला. दुसर्या बाजूने व्यायाम शाळांच्या माध्यमातून कमी वेळेत ते युवकांपर्यंत अमोल जावळे यांना पोहचविण्यात यशस्वी झाले. भाजपाच्या बाजूने वातावरण तयार करून मित्र अमोल जावळे यांना मोठे मताधिक्य मिळवून दिले. मागच्या वेळी काँग्रेस लीड असलेल्या रावेर पूर्व भागात यावेळेस भाजपाला मोठी लीड मिळाली. शहरात देखील भाजपा साडेपाच हजारांनी पुढे होती.
लाडक्या बहिणींचे मतदान मतपेटीत पडण्यावर मोठी भर
अमोल जावळे यांच्या माध्यमातून भाजपाला मतदान करण्यासाठी आरएसएस मोठ्या प्रमाणात सक्रिय झाली. यात लाडक्या बहिणींची मते मतपेटीत टाकण्यासाठी जनजागृती करण्यात आली. धार्मिक एकत्रीकरण करण्यावर मोठ्या प्रमाणात भर देण्यात आला. यामध्ये मागच्या पंचवार्षिकच्या तुलनेत चार टक्के मतदान अधिक झाले आणि त्याचा फायदा थेट भाजपाला झाला. स्व.हरीभाऊ जावळे यांच्या 2019 मध्ये झालेल्या पराभवातून अमोल जावळे यांनी बरेच काही शिकले होते त्यामुळे यावेळच्या निवडणुकीत जावळे यांनी काही निर्णय स्वतःच घेतले होते आणि याची मोठी प्रशंसा मतदारसंघात होत आहे.
संकट मोचकांचा ‘देशमुखी’ डाव यशस्वी
संकटमोचक मंत्री गिरीश महाजन यांनी आरोग्यदूत आणि जिल्हा दूध संघाचे संचालक अरविंद देशमुख यांच्यावर रावेर मतदारसंघातील भाजपा उमेदवार अमोल जावळे यांच्या निवडीची जबाबदारी सोपवली. अरविंद देशमुख यांनी आपल्या सहकार्यांना सोबत घेत प्रचारासाठी रात्रं-दिवस एक केला. ठिकठिकाणी गावात कॉर्नर सभा आणि जाहीर सभांमधून अमोल जावळे यांना विजयी करण्याचे आवाहन केले. अथक परिश्रम आणि मायक्रो नियोजन यशस्वी झाल्याने अमोल जावळे यांच्या विजयात संकट मोचकांचा ‘देशमुखी डाव’ यशस्वी झाल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.