भुसावळात कपड्यांच्या दुकानाला आग लागून 25 लाखांचे नुकसान

भुसावळ (26 नोव्हेंबर 2024) : शहरातील जामनेर रोडवरील श्री आनंद लेडीज वेअर या दुकानाला सोमवारी पहाटे साडेतीन वाजेच्या दरम्यान आग लागली. या आगीत दुकानातील सर्व रेडीमेड कपडे, फॅन्सी कपडे जळून तब्बल 25 लाख दोन हजारांचे नुकसान झाले. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांत अकस्मात आगीची नोंद करण्यात आली. ही आग कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी लावल्याचा संशय व्यक्त होत आहे.
25 लाख रुपयांचे नुकसान
शहरातील जामनेर रोडवरील श्री आनंद लेडीज वेअर या दुकानाला सोमवारी पहाटे तीन ते साडेतीन वाजेच्या दरम्यान आग लागली. या परिसरातून जाणार्या व्यक्तीने ही माहिती माजी नगरसेवक प्रकाश बतरा यांना दिली. बतरा यांनी तत्काळ पालिका अग्निशमन दल व दुकानाचे मालक राकेश महेश कुकरेजा यांना माहिती देवून घटनास्थळ गाठले. शटर उघडून तत्काळ आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. या आगीत दुकानातील केवळ एकच कपड्यांचा डाग वाचला. उर्वरित सर्व सुमारे 25 लाख रुपयांचे कपडे जळून खाक झाले. पाहणीत दुकानाचे शटर सहा इंच वर आलेले दिसल्यामुळे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने ही आग लावल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. दरम्यान दुकान मालक कुकरेजा यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन अकस्मात आगीची नोंद करण्यात आली. तपास हवालदार प्रशांत देशमुख करीत आहेत.

दोन दिवसांपूर्वी आणलेला मालही जळाला
आनंद लेडीज वेअरचे संचालक कुकरेजा यांनी गेल्या दोन दिवसांपूर्वीच नवीन मालाचे 17 डाग दुकानात आणले होते. हे डाग उघडलेदेखील नव्हते. आगीमध्ये हा मालही जळून खाक झाला. अजून काही कपड्यांचा माल बुकींग केला होता मात्र ट्रान्सपोर्टमध्ये उशिर झाल्याने हा माल दुकानात पोहोचला नसल्याने आणखी मोठा अनर्थ टळला.