मध्य रेल्वेत रेल्वे अपघातांना लागणार ‘ब्रेक’ : दहा हजार रेल्वे इंजिनाला ‘कवच’ मंजुरी
मध्य रेल्वेचे जीएम धर्मवीर मीना : रेल्वे लाईन मंजुरीनंतर रेल्वे मार्गाची पाहणी
Railway accidents will have to be stopped in Central Railway: ‘Kavach’ approval for ten thousand railway engines भुसावळ (27 नोव्हेंबर 2024) : मनमाड-जळगाव दरम्यान चौथ्या रेल्वे लाईनीला तसेच प्रयागराज-माणिकपूर दरम्यानच्या तिसर्या मार्गाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्री मंडळाने सोमवारी रात्री मंजुरी दिल्यानंतर मध्य रेल्वेचे जीएम धर्मवीर मीना यांनी सोमवारी रात्री उशिरा बडनेरा, मूर्तिजापूर, जलंब, भुसावळ मार्गाची पाहणी केली. रेल्वे मंत्र्यांच्या मार्गदर्शनानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत दहा हजार रेल्वे इंजिनाला (लोकोमोटीव्ह) ‘कवच’ यंत्रणा कार्यान्वीत होणार असल्याचे सांगत रेल्वे अपघातांना आता निश्चितपणे ‘ब्रेक’ लागणार असल्याचा विश्वास
रेल्वे मार्गाला मंत्री मंडळाची मंजुरी : जीएम यांची रात्री पाहणी
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नागपूरात मोदींच्या मंत्री मंडळ निर्णयाची माहिती दिल्यानंतर मध्य रेल्वेचे जीएम धर्मवीर मीना यांनी सोमवारी रात्री उशिरा बडनेरा, मूर्तिजापूर, जलंब, भुसावळ दरम्यान रेल्वे मार्गाची पाहणी करीत इन्स्पेक्शन केले. यावेळी त्यांच्यासोबत भुसावळच्या डीआरएम ईती पाण्डेय उपस्थित होत्या.
भुसावळात यार्डात जीएम यांची भेट
जीएम धर्मवीर मीना यांनी मंगळवारी सकाळी डीआरएम यांच्या सोबत भुसावळातील यार्डला भेट देत विविध विभागांची पाहणी केली तसेच आरआरआय कॅबीन व झेडटीएस युनिटला भेट देत माहिती जाणून घेतली. भुसावळ भेटीवर प्रथमच आलेल्या जीएम यांचे रेल्वे प्रशासनातर्फे स्वागत करण्यात आले.
अपघात रोखण्यासाठी मध्य रेल्वेच्या सर्वच रुटवर ‘कवच’ प्रणाली
भुसावळ डीआरएम कार्यालयात दुपारी रेल्वे मंत्र्यांच्या संवादानंतर जीएम यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मंजूर रेल्वे लाईनसह त्यामुळे होणार्या फायद्यांची माहिती दिली तसेच मध्य रेल्वेच्या सर्वच रुटवर आगामी काळात ‘कवच’ यंत्रणा कार्यान्वीत होईल, असे सांगत त्याबाबत निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दहा हजार लोकोला (रेल्वे इंजिन) ‘कवच’ प्रक्रिया लावण्याची प्रक्रिया सुरू असून आता 22 तासांमध्ये एका इंजिनाला कवच लावण्याचा विक्रम आपल्या अभियंत्यांनी केल्याचेही त्यांनी सांगितले.
स्वतंत्र गाडीसह कार्डलाईन गाड्यांना थांब्याचा प्रस्ताव पाठवणार
भुसावळ रेल्वे स्थानकावरून मुंबईसाठी स्वतंत्र रेल्वे गाडी सोडण्यासह भुसावळ कॉर्डलाईनवरून धावणार्या 14 गाड्यांना वरणगाव अथवा भुसावळ रेल्वे स्थानकावर थांबा देण्याबाबत जीएम यांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी या संदर्भात यापूर्वीच प्रस्ताव पाठवल्याचे सांगून पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.
कवच प्रणालीमुळे अपघात टळणार
जीएम यांनी कवच प्रणालची माहिती देताना सांगितले की, लोको पायलट मेल-एक्स्प्रेस गाड्यांवर नियंत्रण ठेवू न शकल्यास कवच प्रणाली कार्यरत होऊन रेल्वेगाडीतील ब्रेक यंत्रणा सक्रिय होवून गाडी थांबेल शिवाय समोरा-समोर येणार्या किंवा मागून येणार्या गाड्यांची टक्कर टाळता येईल. आपत्कालीन परिस्थितीत संदेश देणे, लाल सिग्नल ओलांडण्यापासून रोखण्याचे काम ही कवच यंत्रणा करेल. रेल्वे मार्गावर, रेल्वे इंजिन, रूळ आणि सिग्नलमध्ये ही यंत्रणा बसविण्यात येते, असेही जी.एम.यांनी यावेळी सांगितले. भुसावळच्या डीआरएम ईती पाण्डेय तसेच रेल्वे अधिकारी यावेळी उपस्थित होते.