मतपत्रिकेवर निवडणुकांसाठी राहुल गांधी यांची देशव्यापी यात्रा


नवी दिल्ली (27 नोव्हेंबर 2024) : विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमवर पुन्हा टीकेची झोड उठल्यानंतर महाविकास आघाडीने आता ईव्हीएमविरोधात मोहिम उघडली आहे. भारत जोडो यात्रेप्रमाणे आता पुन्हा राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली मतपत्रिकेवर निवडणुका घेण्यासाठी महाराष्ट्रात यात्रा काढली जाणार आहे.

लोकशाहीत जनताच सर्वोच्च
लोकशाही वाचवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. काँग्रेस पक्षाने स्वातंत्र्याची लढाई लढलेली आहे, जनभावना तीव्र झाल्यानंतर 150 वर्षांची ब्रिटिश सत्ता संपुष्टात आली हा इतिहास आहे. लोकशाही व्यवस्थेत जनताच सर्वोच्च असून जनभावनेचा आवाज काँग्रेस उठवत आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

महाराष्ट्रात सह्यांची मोहिम
मतपत्रिकेवर निवडणुका घेण्यासाठी जनआंदोलन उभे करण्याची घोषणा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी संविधानदिनी दिल्लीत केली. आहे. महाराष्ट्रात लवकरच या मागणीसाठी सह्यांची मोहीम सुरु केली जाणार आहे. जनतेच्या सह्यांचे लाखो अर्ज राष्ट्रपती, पंतप्रधान, सरन्यायाधीश व निवडणूक आयोगाला पाठवले जाणार आहेत.

महाराष्ट्रावरील निकालात कुणाचाही विश्वास नाही
टीळक भवन येथे काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचीत आमदारांची बैठक झाली. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना नाना पटोले म्हणाले की, महाराष्ट्र विधानसभेच्या निकालावर कोणाचाही विश्वास बसत नाही. या निकालात काहीतरी गडबड असल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे. संविधानाने सर्वांना मतदानाचा अधिकार दिलेला आहे पण आपण एकाला दिलेले मत दुसर्‍यालाच जात असल्याची भावना जनतेत आहे. जनतेच्या भावनांचा आदर करत मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्यात या मागणीसाठी काँग्रेस पक्ष राज्यभर सह्यांची मोहिम सुरु करणार आहे. महामहीम राष्ट्रपती, पंतप्रधान, सरन्यायाधीश व निवडणूक आयोग यांच्याकडे हे अर्ज पाठवण्यात येतील, असे नाना पटोले म्हणाले.


कॉपी करू नका.