देशातील रेल्वे स्थानकावरील तिरंग्यासमोर रोज व्हावे राष्ट्रगीत
भुसावळातील शिशिर जावळे यांची रेल्वे मंत्र्यांकडे मागणी
भुसावळ (2 डिसेंबर 2024) : देशभरातील रेल्वे स्थानकाबाहेर डौलाने फडकणार्या तिरंग्यासमोर दररोज राष्ट्रगीत म्हटले जावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव शिशिर जावळे यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.
देशाचा वाढवावा गौरव
देशाचा गौरव आणि सन्मानाचे प्रतीक म्हणजे राष्ट्रीय ध्वज तिरंगा. भारतीय रेल्वेने भारतातील सर्व प्रमुख रेल्वे स्थानकांवर शंभर फूट उंचीचा व चाळीस फूट लांब आणि तीस फूट रुंद असलेला राष्ट्रध्वज तिरंगा रेल्वेच्या जागेमध्ये फडकवण्याचा निर्देश दिले आहेत. भारतातील विविध प्रमुख रेल्वे स्थानकांवरती मोठ्या डौलाने आज तिरंगा फडकताना दिसत आहे. भारतातील जनतेमध्ये राष्ट्रभावना जागृत करून देशाची राष्ट्रीय अखंडता एकता कायम टिकवण्यासाठी राष्ट्रध्वजापासून सर्वांना प्रेरणा मिळावी तसेच देशाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी प्राणाची आहुती देणार्या शहिद, हुतात्मे यांच बलिदान चिरकाल स्मरणात राहण्यासाठी त्यापासून प्रोत्साहन घेण्यासाठी हा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. भारतीय रेल्वेने ज्या-ज्या प्रमुख रेल्वे स्थानकांवर ह्या तिरंग्यांची राष्ट्रध्वजाची उभारणी केली आहे, अशा ठिकाणी राष्ट्रध्वजासमोर दररोज रेल्वे प्रशासनाने स्थानिक नागरिकांना आवाहन करून राष्ट्रगीत सादर करावे, अशी विनंती वजा मागणी भारतीय जनता पार्टीचे ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव शिशिर जावळे यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.