बोदवडला माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात 29 वर्षांच्या आठवणींना उजाळा
Memories of 29 years rekindled at Bodwad alumni gathering बोदवड (2 डिसेंबर 2024) : शहरातील राष्ट्रीय शिक्षण संस्था बोदवड संचलित सर सत्यजित राम नेमाडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या रौप्य महोत्सवानिमित्त माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात झाला. या मेळाव्यात 1995 ते 2024 पर्यंत शिक्षण घेतलेल्या एकूण 250 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत जुन्या आठवणींना उजाळा दिला.
आठवणीत रमले विद्यार्थी
स्नेहमेळाव्यात एकत्र आलेले सर्व माजी विद्यार्थी आठवणीत रमून गेले. विद्यालयाचे दिवंगत शिक्षक व विद्यार्थी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी अमेरिका, थायलंड, ऑस्ट्रेलिया, गुजरात, पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, गडचिरोली, जळगाव, मालेगाव येथे कार्यरत विद्यार्थ्यांनी त्यांच्या आठवणी ताज्या केल्या. प्रत्येकजण आपली शाळा कशी आहे, हे डोळ्यांमध्ये साठवून घेत होते. आपले जुने वर्ग मित्र भेटल्याचा आनंद सर्वांच्याच चेहर्यावर दिसून आला. अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुखाध्यापक आर.टी.बडगुजर होते. प्रास्ताविक आर.जी.हजारी यांनी केले.
विद्यार्थ्यांनी दिली देणगी
या कार्यक्रमासाठी शांताराम ढकचवळे पाच हजार 555, सलमान रंगरेज पाच हजार 1, प्रमोद रमेश वराडे व दिनकर मोरे पाच हजार, प्रवीण वराडे दोन हजार 501, आशा माळी दोन हजार, आकाश कोळी एक हजार, सागर बोथरा, जयवीर ताथेड, कल्पेश सुराणा, मनोज रुणवाल 11 हजार, संतोष माळी, शुभम माळी, आकाश गावंडे तर मंडप व्यवस्थेसाठी शुभम शेळके, फलक चित्रीकरण प्रथमेश पाटील एक हजार शंभर, किरण पाटील एक हजार तसेच बॅच 2005 यांच्याकडून 15 हजार 250 रकमेचा सीसीटीव्ही कॅमेरासेट या माजी विद्यार्थ्यांकडून देणगी स्वरूपात देण्यात आला.
माजी विद्यार्थ्यांकडून जुन्या आठवणींना उजाळा
लहानपणी नकोशी वाटणारी शाळा नंतर मात्र हवीहवीशी वाटते, धकाधकीच्या आयुष्यात प्रत्येक जण आपापल्या कामात गुंतलेला आहे, पण शाळेची आठवण कायम येत असल्याचे प्रत्येकाच्या तोंडून निघाले. शाळेच्या आठवणी शब्दात व्यक्त करणे कठीण आहे. शाळेची तर गोष्टच काही औरच असते. याचा प्रत्यय कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांच्या मनोगतातुन व्यक्त झाला.जवळपास 30 वर्षांनंतर एकत्र आलेल्या मित्रांनी शाळेत असताना केलेल्या गमती-जमती, शिक्षकांनी केलेली शिक्षा, अशा अनेक आठवणींना उजाळा देत प्रार्थना, स्नेहभोजन आणि संगीताच्या तालावर नृत्य सादर केले. सूत्रसंचालन अमर सूनगत यांनी केले. यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व माजी विध्यार्थी यांनी परिश्रम घेतले.