जळगावात वयोवृद्धाला शेअर ट्रेडींगमध्ये नफ्याच्या आमिषाने 42 लाखांचा गंडा
Elderly man duped of Rs 42 lakhs in Jalgaon with the promise of profit in share trading जळगाव (8 डिसेंबर 2024) : शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणुकीच्या आमिषाने जळगावातील 65 वर्षीय वयोवृद्धाला 42 लाख 15 हजारांचा गंडा घालण्यात आला. हा प्रकार शनिवार, 7 डिसेंबर रोजी उघडकीस आला. रीतीका देवी नाव सांगणार्या एका मोबाईल धारकाविरोधात जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे फसवणूक प्रकरण
जळगाव शहरातील यशवंत कॉलनी परिसरामध्ये 65 वर्षीय वयोवृद्ध कुटुंबासह वास्तव्याला आहे. शेती काम करून ते आपला उदरनिर्वाह करतात. 13 ऑक्टोबर 2024 रोजी त्यांना एका नंबरवरून रीतिका देवी असे नाव सांगणार्या महिलेने व्हॉट्सअॅपवरून (7224938635, 9179504670, 9665825810) त्यांना एक अॅप्लिकेशन पाठवले. त्यांनी त्यात माहिती भरली. शेअर ट्रेडिंगबाबत माहिती देऊन त्या अॅप्लीकेशनच्या माध्यमातून शेअर ट्रेडिंगमध्ये जास्त परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवण्यात आले. त्यानंतर वृध्दाने सुरूवातील भरलेल्या पाच लाख रुपयांवर सहा लाख रुपये नफा मिळवून दाखवण्यात आला. या गोष्टीवर वृध्दाचा विश्वास बसला. त्यानंतर तरूणीने त्यांच्याकडून वेळोवेळी एकूण 42 लाख 15 हजार रुपये वेगवेगळ्या माध्यमातून स्वीकारले. हा प्रकार 13 ऑक्टोबर 2024 ते 7 डिसेंबर 2024 दरम्यान घडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर वृद्धाने शनिवार, 7 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता जळगाव सायबर पोलिसात रीतीका देवी नाव सांगणार्या मोबाईल धारकावर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड करीत आहे.





