कुर्ला बेस्ट अपघातातील मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत : मुख्यमंत्र्यांची घोषणा
कुर्ला (10 डिसेंबर 2024) : कुर्ला येथे बेस्ट बसच्या अपघातात सात नागरिकांचा मृत्यू ओढवला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबाबत शोक व्यक्त करीत मृतांना श्रद्धांजली अर्पण केली. मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी असून मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाखांची आर्थिक मदत देण्यात येईल तसेच या घटनेत जे जखमी झाले त्यांच्या उपचाराचा खर्च मुंबई महापालिका आणि बेस्टच्या वतीने करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
वडिलांनी मद्यपान केल्याचा आरोप मुलाने फेटाळलास
कुर्ला पोलिसांनी सात जणांचया मृत्यूनंतर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून बसचालक संजय मोरेला अटक केली. बसचा ब्रेक फेल झाल्याने बसवरील नियंत्रण सुटल्याचा दावा आरोपी चालकाने केला मात्र ईलेक्ट्रिक बसमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड झाला नसल्याची बाब समोर आली आहे.
चालक मोरे याने मद्यपान केल्याचाही आरोप झाल्यानंतर संजय मोरे यांच्या कुटुंबियांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. संजय मोरे यांचा मुलगा दीप मोरेने सांगितले की, वडिलांकडून याआधी कुठलाही अपघात घडलेला नाही. माझे वडील नशा करुन गाडी चालवत होते या सगळ्या चुकीच्या बातम्या आहेत. ते कधीही नशापाणी करत नाहीत. त्यांच्याकडे 1989 पासून गाडी चालवण्याचे लायसन्स आहे. त्यांनी 1 डिसेंबरपासून ही बस चालवायला घेतली होती हे अत्यंत खोटं आहे. गेल्या तीन वर्षांपासून लॉकडाऊननंतर माझे वडील बेस्टमध्ये कंत्राटी कामगार म्हणून रुजू आहेत. एवढ्या वर्षात त्यांच्याकडून कधीही अशा प्रकारचा अपघात किंवा कोणालाही नुकसान करण्याची घटना घडली नाही.

सात जणांचा मृत्यू, 49 जखमी
मुंबई शहरातील कुर्ला पश्चिम भागात सोमवारी रात्री ईलेक्ट्रिक बसला भीषण अपघात झाला. भरधाव बसने अनेकांना चिरडलं असून अपघातात आतापर्यंत सात जण मृत्युमुखी पडले असून तब्बल 49 जण जखमी झाले आहेत. बस अपघातानंतर पोलिसांनी चालक संजय मोरे (50) याला ताब्यात घेत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. ईलेक्ट्रिक बस तज्ज्ञांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, बसमध्ये कोणत्याही प्रकारचा तांत्रिक बिघाड झालेला नव्हता. अशा ईलेक्ट्रिक बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास बस जागीच थांबते. त्यामुळे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झालेला नाही, असा दावा तज्ज्ञांकडून करण्यात आला आहे.
अनेक वाहनांचे नुकसान
बेस्ट उपक्रमाच्या माहितीनुसार, बस मार्ग क्रमांक 332 ही कुर्ला रेल्वे स्थानकावरून साकीनाका येथे जात होती. एल.बी.एस.मार्गावर येताच बस ब्रेक एक्सीलरेट झाल्याने चालक संजय मोरे याचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस अपघात झाल्याची माहिती उपक्रमाकडून देण्यात आली बेस्ट बसच्या धडकेत दुचाकी, रिक्षा, इको व्हॅन,पोलीस जीप, टॅक्सी अशा अनेक वाहनांचे नुकसान झाले.




