बांगलादेशात हिंदूवर अत्याचार : भुसावळात एक हजारांवर नागरिकांनी मोर्चा काढत प्रांतांना दिले निवेदन
भुसावळ (11 डिसेंबर 2024) : बांगलादेशात हिंदूवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ शहरातील सकल हिंदू समाजातर्फे मंगळवारी एक हजार नागरिकांसह महिलांच्या उपस्थितीत प्रांताधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. शहरातील महाराणा प्रताप चौकात मंगळवारी सकाळी 10.30 वाजता सकल हिंदू समाजातील महिला, पुरूष जमा झाल्यानंतर त्यांनी हाती भगवा झेंडा घेत मोर्चाला सुरुवात झाली. महाराणा प्रताप चौकातून निघालेला हा मोर्चा गांधी पुतळा, तहसील कार्यालयावरून पंचमुखी हनुमान मंदिर, टेक्निकल हायस्कूलवरून प्रांताधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. मोर्चात सकल हिंदू महिला, पुरूषांसोबतच संत, महंत सहभागी झाले.
अन्यायाविरोधात आवाज उठवण्याचे आवाहन
समस्त हिंदू महिला, पुरूषांचा मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयावर धडकल्यावर तेथे मोर्चाचे रूपांतर सभेत होऊन तेथे उपस्थितांमधील संत, महंत यांनी मनोगत व्यक्त केले. यात निलेश खांडवेकर, जिग्याशी महाराज, मिलिंद महाजन यांनी मनोगत व्यक्त केले. सकल हिंदूंनी एकत्र येऊन होत असलेल्या अन्यायाविरूध्द आवाज उठवावा, असे आवाहन मान्यवरांनी केले.

संत, महंतांनी दिले निवेदन
संत, महंतांनी प्रांताधिकार्यांचे दालन गाठत बांगलादेशाच्या निषेधाचे निवेदन प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांना दिले. हे निवेदन सरकारला पाठवण्याची विनंती करण्यात आली.




