प्रख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन
मुंबई (15 डिसेंबर 2024) : आपल्या तबल्याच्या अदाकारीने गेल्या अनेक काळापासून अधिराज्य गाजवलेल्या प्रख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचे वयाच्या 73 व्या वर्षीय अल्पशा आजाराने अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात रविवारी निधन झाले.
विविध पुरस्कारांनी गौरव
उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म 9 मार्च 1951 मध्ये महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे झाला. आपल्या तबला वादनातील कौशल्याच्या जोरावर त्यांनी अल्पावधीतच संगीतक्षेत्रात मोठी झेप घेतली. त्यांच्या कलागुणांचा गौरव करताना भारत सरकारने त्यांना 1988 मध्ये पद्मश्री, 2002 मध्ये पद्मभूषण आणि 2023 पद्मविभूषण देऊन गौरविले आहे. याशिवाय, 1999 मध्ये त्यांना यूएस नॅशनल एन्डॉवमेंट फॉर द आर्ट्सद्वारे राष्ट्रीय वारसा फेलोशिप प्रदान करण्यात आली, त्यानंतर त्यांना भारतीय शास्त्रीय संगीताचे जागतिक राजदूत म्हणून मान्यता मिळाली होती. त्यांनी तीन वेळा ग्रॅमी अवॉर्डही जिंकला होता. उस्ताद झाकीर हुसेन हे पहिले भारतीय संगीतकार आहेत, ज्यांना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी व्हाईट हाऊसमध्ये जागतिक मैफिलीसाठी आमंत्रित केले होते.
अमेरिकेत पहिल्यांदा कला सादर
उस्ताद झाकीर हुसेन यांच्या वडिलांचं नाव उस्ताद अल्लाह रक्खा कुरैश होतं. ते पेशाने तबला वादक होते. त्यांच्या आईचं नाव बीवी बेगम होतं. झाकीर हुसेन यांनी मुंबईतील माहिम येथील सेंट मायकेस स्कूलमधून शिक्षण घेतलं होतं. तर मुंबईतील सेंट झेव्हियर कॉलेजमधून त्यांनी पदवी मिळवली होती. 11 वर्षीय झाकीर हुसेन यांनी थेट अमेरिकेत पहिल्यांदा प्रेक्षकांसमोर आपली कला सादर केली होती.