मुलाला डिजिटल अॅरेट दाखवत यावलच्या दाम्पत्याला एक लाख 30 हजारांचा गंडा
यावल (26 डिसेंबर 2024) : मुलाला डिजिटल अॅरेट झाल्याचे दाखवत यावलच्या दाम्पत्याला एक लाख 30 हजारांचा गंडा घालण्यात आला.
काय आहे नेमका प्रकार
यावल शहरातील विस्तारित भागात राज्य परिवहन मंडळातून सेवानिवृत्त झालेले प्रौढ आपल्या पत्नीसह राहतात. त्यांचा मुलगा एरोली, मुंबई येथे एका कंपनीत नोकरीला आहे. बुधवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास त्यांना व्हॉट्सअॅपवर कॉल आला. संबंधीत इसमाने आपण सीबीआय अधिकारी आहोत आणि तुमच्या मुलाला गैरकृत्य प्रकरणी ताब्यात घेतल्याचे सांगितले. तुम्ही तत्काळ दीड लाख रुपये द्या, अशी मागणी करण्यात आली तसेच त्यांच्या मुलाची भयभीत अवस्थेतील बनावट ऑडिओ क्लिप त्यांना ऐकवली.
संबंधित वृध्द या प्रकाराने घाबरले व त्यांनी त्यांच्या व त्यांच्या पत्नीच्या खात्यातून एक लाख 30 हजार रुपये संबंधित इसमाने दिलेल्या फोन पे खात्यावर पाठवले व कॉल कट केला आणि त्यांनी तत्काळ त्यांच्या मुलाला कॉल केला. मुलाने आपण मुंबई येथे आहोत व मला कोणीच पकडले नव्हते किंवा, अशी कुठली घटना घडली नव्हती असे त्यांनी सांगताच वृद्ध दांपत्याची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी ऑनलाईन तसेच यावल पोलीस ठाण्यात अज्ञात भामट्याविरोधात गुन्हा दाखल केला.