मेघगर्जनेसह पाऊस होणार ! ; जळगाव जिल्ह्यासाठी हवामान विभागाचा असा आहे अंदाज


मुंबई (26 डिसेंबर 2024) : डिसेंबर महिन्यात पावसाचा अंदाज हवामान विभागने वर्तवला आहे. शुक्रवारी व शनिवारी दोन दिवस खान्देशातील नंदुरबार, धुळे, जळगाव, अहिल्यानगर जिल्ह्यांसह, दक्षिण मराठवाडा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांतील पूर्व भागांत मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे.

खान्देशात होणार वादळी पाऊस
हवामान विभागाच्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारपासून नंदुरबार, धुळे, जळगाव, अहिल्यानगर जिल्ह्यांसह, दक्षिण मराठवाडा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांतील पूर्व भागांत मेघगर्जनेसह पावसाची सुरुवात होईल. रात्रीपर्यंत वादळी पाऊस पश्चिम विदर्भ आणि शेजारच्या मराठवाड्यात हजेरी लावण्याची शक्यता आहे. यामध्ये बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि बीड जिल्ह्यांचा समावेश आहे.

या भागांमध्ये काही प्रमाणात गारपिटीची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या उर्वरित जिल्ह्यांतील काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शनिवारी पहाटेपर्यंत वादळी पाऊस पूर्वेकडे सरकण्याची शक्यता असून, विदर्भातील इतर जिल्ह्यांत हजेरी लावेल. या भागांमध्ये काही प्रमाणात गारपीट होण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यातील काही तुरळक ठिकाणे वगळता राज्यातील बहुतांश भागांत स्थिर हवामान राहिल, तसेच सोमवारपासून थंडीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


कॉपी करू नका.