मोहाडी पोलिसांची मोठी कारवाई : पुणे, संगमनेर जिल्ह्यातील कुविख्यात गुन्हेगारांकडून दोन पिस्टल व दहा काडतूस जप्त
पुण्याकडे ट्रॅव्हल्स निघाल्यानंतर मोहाडी हद्दीत पोलिसांची नाकाबंदीद्वारे मोठी कारवाई
Major action by Mohadi Police : Two pistols and ten cartridges seized from notorious criminals of Pune, Sangamner district धुळे (27 डिसेंबर 2024) : चोपडा येथून धुळ्यामार्गे पुण्याकडे निघालेल्या संगीतम ट्रॅव्हल्समधील तीन तरुणांकडे शस्त्र असल्याची माहिती धुळ्यातील मोहाडी पोलिसांना मिळाल्यानंतर बस अडवून तीन तरुणांना अटक करण्यात आली. संशयीतांच्या ताब्यातून दोन गावठी पिस्टल व दहा जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.
कुविख्यात आरोपींविरोधात गुन्हे दाखल
कुणाल बाळू गाडे (22, साकोरे, ता.आंबेगाव, जि.पुणे), महेश सीताराम देवकर (19, धोबी मंचर, ता.आंबेगाव, जि.पुणे) व दीपक राजू मोहिते (29, आंबी खालसा, घारगाव, ता.संगमनेर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. मोहाडी हद्दीत बस (एम.एच.19 सी.वाय.8666) आल्यानंतर सीट क्रमांक 27 29 वरून तिघा आरोपींना अटक करण्यात आली. गुरुवार, 26 रोजी रात्री साडेदहा वाजता ही कारवाई करण्यात आली. आरोपी देवकर विरोधात नारायणगाव पोलिसात तर दीपक मोहिते विरोधात धारगाव, नगर येथे गुन्हा दाखल आहे.
यांनी आवळल्या मुसक्या
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, पोलीस उपअधीक्षक राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील, ग्रेडेड उपनिरीक्षक नितीन करंडे, चालक हवालदार मंगल पवार आदींच्या पथकाने ही कारवाई केली.