सरपंच हत्येतील ‘त्या’ आरोपींची हत्त्या झाल्याचा दमानियांचा दावा फोल


मुंबई (29 डिसेंबर 2024) : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मस्सोजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तीन आरोपींची हत्या झाल्याचा दावा एका व्हॉईस मेसेजच्या हवाल्याने केला मात्र तपासाअंती हा दावा फोल ठरला असून संबंधित व्यक्तीने दारूच्या नशेत हे कृत्य केल्याचा खुलासा पोलिसांनी केला आहे.

दारूच्या नशेत केला मेसेज
अंजली दमानिया यांनी पोलिसांकडे संबंधित माहिती दिल्यानंतर असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे बीड पोलिसांनी सांगितले. ज्या इसमाने अंजली दमानिया यांना तो व्हॉईस मेसेज पाठवला, त्याने दारुच्या नशेत तो मेसेज पाठवल्याचा खुलासा पोलिसांनी केला. आरोपीचा शोधकार्यास अडथळा किंवा जनतेमध्ये संभ्रम निर्माण होईल, अशा प्रकारची माहिती किंवा कॉमेंट करू नये अशा सूचनादेखील पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत. दरम्यान, संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी बीड पोलिस अधीक्षक कार्यालयामार्फत एक पत्रक देखील प्रसिद्ध करण्यात आले आहे. संतोष देशमुख खून प्रकरणात कोणत्याही प्रकारची माहिती असल्यास प्रथम पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन या पत्रकात करण्यात आले आहे.

तीन आरोपी अद्यापही पसार
संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली तर तीन आरोपी अद्यापही पसार आहेत. या पसार आरोपींची हत्या झाली, असा व्हॉईस मेसेज मला आला होता, अशी माहिती अंजली दमानिया यांनी दोन दिवसांपूर्वी दिली होती. यामुळे एकच खळबळ उडाली होती. अंजली दमानिया यांनी ही माहिती बीडच्या पोलिस अधीक्षकांना दिली. पोलिसांनी याबाबत तपास केला असता, हा कॉल आणि मेसेज खोटा असल्याचे सांगितले.


कॉपी करू नका.