वीज चोरी प्रकरणी अहिरवाडी येथील तिघांविरुद्ध गुन्हा
यावल (31 डिसेंबर 2024) : कर्जोद येथील राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कक्ष अंतर्गत येणार्या अहिरवाडी गावात वीज चोरांविरुद्ध धडक मोहीम राबवण्यात आली. तिघे वीज चोरी करतांना आढळले होते. या तिघांना त्यांनी चोरी केलेल्या वीज युनिट नुसार दंड आकारून नोटीस देण्यात आली मात्र या तिघांनी दंड न भरल्याने यावल पोलीस ठाण्यात या तिघांविरुद्ध सोमवारी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे वीज चोरी प्रकरण
रावेर तालुक्यातील कर्जोद येथील विद्युत वितरण कंपनीच्या कक्षाचे कनिष्ठ अभियंता मुकेश ठाकरे यांच्यासह पथकाने अहिरवाडी या गावात 16 मे 2024 रोजी वीज चोरीविरुद्ध धडक मोहिम राबवली होती. यामध्ये त्यांना सुनील रामदास महाजन, सीताराम तुकाराम महाजन व रामचंद्र जगन्नाथ सुतार हे तिघे वीज चोरी करतांना आढळले. तिघांनी 836 युनिट चोरी केली. त्याची किंमत 15 हजार 604 रुपये असून संबंधिताना त्यांनी चोरी केलेल्या वीज युनिट नुसार दंड आकारून तसेच तडजोड रक्कम सहा हजार अशी आकारणी करून दंड भरण्याची नोटीस देण्यात आली मात्र या तिघांनी वेळेत दंड न भरल्याने तिघांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात मुकेश ठाकरे यांच्या फिर्यादीवरून वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुनील पाटील करीत आहे.








