नागपूरात खून करून रेल्वेने पसार झालेल्या आरोपींना भुसावळात बेड्या
रेल्वे सुरक्षा बल, लोहमार्ग व बाजारपेठ पोलिसांची संयुक्त कामगिरी
Accused who fled by train after murdering in Nagpur, chained in Bhusawal भुसावळ (1 जानेवारी 2025) : नागपूरच्या धंतोली पोलीस ठाणे हद्दीत 45 वर्षीय प्रौढावर शस्त्राने हल्ला करीत तसेच मारहाण करीत खुनानंतर मृतदेह फेकून देण्यात आला होता. ही घटना शुक्रवार, 27 डिसेंबर रोजी रात्री 11.15 वाजता कुंभारटोली, हम्पियार्ड रोड, लोहारकर हॉटेलजवळ घडली होती. अनोळखीच्या खुनानंतर संशयीत डाऊन 12869 हावडा एक्स्प्रेसने पसार होत असल्याची माहिती भुसावळातील बाजारपेठ, लोहमार्ग व रेल्वे सुरक्षा बलाला कळवण्यात आल्यानंतर यंत्रणेने संयुक्तरित्या कारवाई करीत दोघांना अटक केली. भूषण अशोक ठाकरे (19, रा.नवाबपूर मस्जिद जवळ, ताजसाई बिर्याणी जवळ, नागपुर) व आकाश सदाशीव वाघमारे (21, रा.नवाबपूर मस्जिद जवळ, ताजसाई बिर्याणी) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
काय आहे नेमके प्रकरण
नागपूरच्या धंतोली पोलीस ठाणे हद्दीत शुक्रवारी रात्री 11.15 वाजता लोहारकर हॉटेलसमोर एका ऑटोतून अनोळखीची हत्या करून त्यास फेकून देण्यात आले होते. आरोपींनी अनोळखीवर शस्त्राने हल्ला करीत तसेच मारहाण करीत त्याचा खून केला व त्यानंतर त्यास फेकून दिले. पोलिस हवालदार सतीश वासाडे यांच्या तक्रारीवरून ऑटो चालकासह तिघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला मात्र संशयीत पसार झाले होते. सीसीटीव्हीवरून आरोपींची ओळख पटल्यानंतर त्यांचा शोध सुरू करण्यात आला.

संशयीत रेल्वेने पसार : भुसावळात पडल्या बेड्या
खून करून मुंबईला पळून गेलेले संशयीत हावडा सुपरफास्ट एक्सप्रेसने भुसावळच्या दिशेने येत असल्याची माहिती नागपूरचे एसीपी अभिजीत पाटील यांनी दिल्यानंतर भुसावळात रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक पी.आर.मीना, लोहमार्ग निरीक्षक सुधीर जंजाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या नेतृत्वात कर्मचार्यांनी शनिवारी दुपारी हावडा एक्सप्रेस आल्यानंतर गार्ड डब्यापासून तिसर्या क्रमांकाच्या जनरल डब्यातून दोघा आरोपींना अटक केली. नागपूर पोलिसांना सूचित केल्यानंतर गुन्हे शाखा युनिट क्रमांक तीनचे पोलीस उपनिरीक्षक नवनाथ देवकाते व सहकार्यांनी आरोपींचा ताबा घेतला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, बाजारपेठचे निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजु सांगळे, पोलीस हवालदार विजय नेरकर ,निलेश चौधरी, भूषण चौधरी, मोहम्मद जाफर यांनी केली. याकामी रेल्वे सुरक्षा बल निरीक्षक पी.आर.मीना, इम्रान खान, महेंद्र कुशवाह, जोगेंद्र नेरपगार, रामकृष्ण काकोडीया यांची मदत लाभली.







