कुंभार समाज बांधवांच्या वीटभट्टी नुकसानीची पाहणी

मूल्यांकन निश्चित करून दोन दिवसात होणार पंचनामे


यावल (1 जानेवारी 2025) : शहर व तालुक्यात दोन दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस झाला होता. या पावसामुळे शेती क्षेत्रात नुकसान झाले तर यावल शहरात जुन्या कोरपावली रस्त्यावर असलेल्या कुंभार समाजबांधवांच्या वीट भट्यांचेदेखील मोठे नुकसान झाले. या वीटभट्ट्यांचे देखील पंचनामे व्हावे यासाठी आमदार अमोल जावळे यांनी महसूल विभागाला सूचना केल्या व त्यांच्या सूचनेवरून सोमवारी महसूल विभागाच्या पथकाने या ठिकाणी येऊन प्रत्यक्ष पाहणी केली. तब्बल 25 कुटुंबाचे मोठ्या प्रमाणावर झाले आहे व मूल्यांकन निश्चित केल्यानंतर येत्या दोन दिवसात अंतिम पंचनामे केले जातील, असे महसूल प्रशासनाने सांगितले आहे.

अवकाळी वादळी पाऊस
शुक्रवार, 27 नोव्हेंबर रोजी सायंकाळी यावल शहर तसेच तालुक्यातील पूर्व भागात वादळी पाऊस झाला होता. गारपीटीसह मोठ्या प्रमाणात हा वादळी पाऊस झाला होता. यामध्ये शेती पिकाचे नुकसान झाले. त्याचप्रमाणे यावल शहरातील कुंभार समाजबांधवांचेदेखील मोठे नुकसान झाले. जुन्या कोरपावली रस्त्यावर खडकाई नदीच्या पायथ्याशी अनेक कुंभार समाज बांधवांचे विटांचे भट्टे आहेत. त्यांनी मात पासून कच्च्या विटा तयार करून थापून या ठिकाणी ठेवल्या होत्या. या पावसामुळे विटा भिजल्या आणि यात पुरी मेहनत वाया गेली व मोठ्या प्रमाणावर कुंभार समाज बांधवांचे नुकसान झाले. प्रशासनाने काहीतरी मोबदला द्यावा, अशी मागणी करण्यात आल्यानंतर आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांनी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांना कुंभार समाज बांधवांच्या या वीट भट्ट्यांच्या नुकसानीचा पंचनामे करण्याच्या सूचना केल्या.


दोन दिवसात अंतीम पंचनामा
तहसीलदारांनी देखील मंडळाधिकारी मीना तडवी व यावलचे प्रभारी तलाठी यांना आदेश केले. सोमवारी तलाठी गजानन पाटील, भाजपा शहराध्यक्ष राहुल बारी यांनी या भागात जाऊन या नुकसान झालेल्या संपूर्ण वीटभट्ट्यांची पाहणी केली. कच्ची वीट तसेच तयार वीट यांच्या संदर्भात मूल्यांकन निश्चित केल्यानंतर येत्या दोन दिवसांमध्ये अंतिम पंचनामे केले जातील असे महसूल प्रशासनाने सांगितले आहे. याप्रसंगी विजय कुंभार, छोटू कुंभार, सुधाकर कुंभार, अरुण कुंभार, राजू कुंभार आदींची उपस्थिती होती.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !