ग्राहकांनो सावधान तुमचीही होवू शकते फसगत ! : ऑनलाईन मोबाईल ऐवजी निघाले साबण
रावेर तालुक्यातील खिर्डी येथील प्रकार, ग्राहक हतबल
खिर्डी (2 जानेवारी 2025) : ऑनलाईन स्वस्त मिळणार्या वस्तूंकडे ग्राहकांचा कल वाढला आहे शिवाय सर्वात स्वस्त व किफायतशीर ऑफर मिळत असल्याने ग्राहकांकडून आता स्थानिक बाजारपेठेऐवजी ऑनलाईन वस्तूंना अधिक मागणी आहे मात्र या ऑनलाईन वस्तूतच जर तुमची फसवणूक होत असेल तर त्यासाठी ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. रावेर तालुक्यातील खिर्डीतील ग्राहकाने 12 हजार रुपये किंमतीचा मागवलेल्या मोबाईलच्या बॉक्समध्ये चक्क आंघोळीचे साबण निघाल्याने ग्राहकाला डोक्याला हात मारून घेण्याची वेळ आली आहे. कुरीयर कंपनीने हात वर केल्याने आता दाद मागावी कुणाकडे ? असा प्रश्न ग्राहकाला पडला आहे.
मोबाईलऐवजी मिळाले साबण
मिळालेल्या माहितीनुसार, येथील रहिवासी सुनील दशरथ पाटील यांनी त्यांच्या मित्रामार्फत एका ऑनलाइन अॅपवरून प्रख्यात कंपनीचा 12 हजार 500 रुपये किंमतीचा मोबाईल ऑफर असल्याने बुक केला होता. त्यानुसार संबंधीताला त्याची डिलिव्हरी मिळाली. डिलिव्हरी देते वेळेस पाटील स्वतः घरी नसल्याने त्यांच्या मुलीने तो मोबाइल बॉक्स घेऊन पैसे दिले व वडिलांना फोन लावत ओटीपी मागीतला तो दिल्यानंतर डिलिव्हरी बॉय निघून गेला. नंतर मोबाईल बॉक्स उघडताच त्यांना धक्काच बसला. मोबाईल बॉक्स वरून सर्वसामान्य दिसत होता मात्र आतमध्ये डेटॉल कंपनीचे तीन व संतूर कंपनीचे दोन असे पाच आंघोळीचे साबण निघाले. यामुळे ऑनलाईन खरेदीत चक्क फसवणूक झाल्याचे समोर आले. यामुळे या विषयाची परिसरात चांगलीच रंगली आहे .





डिलीव्हरी बॉय पण झाला हतबल
याबाबत पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मी कस्टमर केअरला बर्याच वेळा फोन केला पण ते समाधान कारक उत्तर देत नाहीत. डिलिव्हरी बॉयला फोन लावला असता त्याने मी नवीन असून ही घटना माझ्यासाठी पण नविन असल्याने तोही हतबल झाला आहे.
सतर्क राहूनच ऑनलाइन खरेदी करावी
सर्वसाधारण घरातील व्यक्तीसाठी ही रक्कम बरीच मोठी असते. एवढ्या किमतीचा मोबाईल फोन घेण्यासाठी कोणालाही बरीच काटकसर व बचत करावी लागते. पण ज्यावेळी अशी घटना घडते तेव्हा त्या व्यक्तीवर काय परिस्थिती निर्माण होते . हे त्यालाच ठाऊक असते. बर्याच वेळेस कंपनीचा दोष नसतो तर डिलिव्हरी देणारे सुद्धा कधी – कधी अशी कारस्थाने करीत असतात. तेव्हा नागरिकांनी सतर्क राहूनच ऑनलाइन खरेदी करावी, अशी सर्वत्र चर्चा होत आहे.
