यावल शहरासाठीची शेळगाव बॅरेजवरून मंजूर पाणीपुरवठा योजनेची निविदा प्रक्रिया राबवा : अतुल पाटील


यावल (4 जानेवारी 2025) : नगरोत्थान महाभियान योजनेंतर्गत शेळगाव बॅरेजवरून यावल शहराच्या पाणीपुरवठा योजनेस नगरविकास विभागान प्रशासकीय मंजुरी प्रदान केली आहे. या प्रकल्पाच्या मंजुरीनंतर सात दिवसांच्या कालावधीत निविदा प्रक्रिया राबवून तीन महिन्याच्या कालावधीत कार्यादेश देण्यात यावा, असे प्रशासकीय मंजुरी देताना शासन आदेश असतानाही निविदा प्रक्रिया राबविण्यात आली नसल्याने या संदर्भात दखल घ्यावी, अशी मागणी माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी केली आहे.

योजनेच्या कामास विलंब
वास्तविक पाहता निविदा प्रक्रिया राबवून व कार्यादेश देऊन शासनाकडे मंजूर प्रकल्पासाठी पहिल्या हप्त्याच्या निधीसाठी मागणी करावी, अशी अट शासन निर्णयात आहे परंतु निविदा प्रक्रिया न राबविल्यामुळे योजनेचे काम सुरू करण्यास व निधी प्राप्त होण्यास विलंब होत आहे. योजना शहरासाठी पथदर्शी असून ती लवकरात लवकर सुरू व्हावी म्हणून येथील माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी मागणी केली आहे.


निविदेअभावी उद्यानातील खेळण्यांची दुरवस्था
यावल शहरातील विविध भागात नगरपरिषदेने लाखो रुपये खर्च करून खुल्या जागेवर उद्यान निर्मिती केली आहे मात्र बहुतांशी ागीच्यांची देखभाल दुरुस्तीची निविदा प्रक्रिया दिड वर्षांपासून न राबविल्यामुळे बगीच्यातील झाडे, फुले व खेळणी यांची दुरवस्था झाली आहे. या प्रकाराला नगरपरिषदेची उदासीनता कारणीभूत आहे. निविदा प्रक्रिया त्वरित राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. नगरपालिका हद्दीतील इस्लामपूर ते आझादनगर भागास जोडण्यात येणार्‍या पूल बांधण्याच्या कामास तसेच विस्तारीत भागातील गंगा नगर, तिरुपती नगर, गणपती नगर व आयेशा मशिदीकडे जाणाीर्‍या रस्ता कामांचा कार्यादेश देऊन महिना उलटला तरी अद्यापपावेतो कामे सुरू झालेली नाहीत. त्याच बरोबर शिवजी नगार, गजानन महाराज मंदिर परिसरात भागात काँक्रिट रोड व पेव्हर ब्लॉक बसविणे निविदा मुदत संपून देखील उघडण्यात आलेल्या नाहीत. याबाबत नगरपरिषदेची उदासीनता दिसून येत आहे. वरील सर्व कामांमध्ये मुख्याधिकारी यांनी लक्ष देऊन सर्व कामे मार्गी लावावेत व नगरपालिकेचा कारभार गतिमान करावा, अशी मागणी येथील माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी लेखी पत्र देऊन केली आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !