‘त्या’ वक्तव्यानंतर अंजली दमानियांना आले धमक्यांचे 800 कॉल्स !

धनंजय मुंडे , पंकजा मुंडे यांच्याकडून वंजारी समाजाचा वापर होत असल्याचा आरोप


बीड (5 जानेवारी 2025) : स्व.गोपीनाथ मुंडे यांच्याबाबत वक्तव्य करणार्‍या अंजली दमानिया यांच्याविरोधात वंजारी समाज विरोधात आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून आपला मानसिक छळ होत असल्याचा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी करीत बीड जिल्ह्यातून अनेकांचे धमकीचे फोन येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नरेंद्र सांगळे ही व्यक्ती फोन करत आहेत. मला चार दिवसांपासून फोन येत आहेत. पहिल्या दिवशी 700-800 कॉल आले, फोन अजून बंद झालेले नाहीत, असे दमानिया म्हणाल्या आहेत.

दमानियांची पत्रकार परिषद
अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली त्या म्हणाल्या की, मी दोन विधानं केली होती. उच्चपदांवर वंजारी लोक बीडमध्ये आहेत, असं बोलले होते. गोपीनाथ मुंडेंच्या काळापासून हे होत आलं होतं. कोणत्याही प्रकारे जाती समाजाविरोधात बोलले नाही. ट्विटरवर स्पष्ट करण्यासाठी मी दोन मुद्दे टाकले होते. भगवान बाबा नेहमीच वंदनीय आहेत. समाज आळशी आहे, असं मी कुठेही म्हंटलं नाही. समाजाला हा प्रकार चुकीच्या पद्धतीनं सांगण्याचे काम केले गेले. सानप, मुंडे उच्च पदावरील माणसं परळीतच का? यासंदर्भात मी बोलले आणि ते लिहिलं देखील होतं आणि दाखवलं होतं.


समाजाचा होतोय वापर
वंजारी समाजाचा वापर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्याकडून होतोय, यात शंका नाही. शिक्षक भरतीसंदर्भात याचिका दाखल झाली होती. बिंदू नामावली निभावू, असं राज्य सरकारकडून सांगण्यात आलं होतं मात्र या संदर्भात पंकजा मुंडे यांनी ट्विट करत त्याला स्थगिती दिली आणि हे फॅक्ट आहे. मी पेपरशिवाय बोलत नाही, असे म्हणत त्यांनी पंकजा मुंडे यांनी केलेले ट्विट दाखवले.

अख्खी फौज माझ्या मागे
दमानिया पुढे म्हणाल्या की, अख्खी फौज माझ्या मागे लावण्यात आली. नरेंद्र सांगळे यांनी माझा नंबर फेसबुकवर टाकलाय, फोन उचलत नाही तोपर्यंत कॉल करत राहा, असा उल्लेख त्यात करण्यात आला आहे. बाजारु कार्यकर्ते म्हणत ट्वीट करायला लागलेत. सुनिल फड यांनी देखील तसंच केले आहे. खालच्या दर्जाच्या कमेंट करायला सुरुवात केली आहे. मला पहिल्या दिवशी 700-800 कॉल आले, आज चौथा दिवस आहे आणि फोन बंद झालेले नाहीत. हे सगळे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचे कार्यकर्ते असल्याचा दावा, त्यांनी केलाय.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !