नाथाभाऊवर बोलल्यानंतर प्रसिद्धी मिळत असल्याने महाजनांची आपल्यावर टीका : आमदार एकनाथराव खडसे
Mahajan criticizes me for getting fame after speaking about Nathabhau : MLA Eknathrao Khadse भुसावळ (5 जानेवारी 2025) : नाथाभाऊवर बोललं म्हणजे माध्यमांमध्ये व्यापक प्रसिद्धी मिळते म्हणून गिरीश महाजन माझ्यावर नेहमीच बोलतात मात्र त्यांच्या वक्तव्यावर आता बोलणे मी टाळतो आहे कारण गिरीश महाजन हे पागल झाले आहेत, अशी टीका माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी येथे केली. शहरातील संतोषीमाता सभागृहात रविवारी आयोजित मेळाव्याप्रसंगी माध्यमांशी बोलताना त्यांनी महाजनांवर टीका केली.
मुलगा गेल्याचे दुःख अजूनही मनात कायम
आमदार खडसे म्हणाले की, गिरीश महाजन यांना मुलगा नसल्यामुळे मुलगा गेल्याचे दुःख त्यांना नाही पण माझा एकुलता एक मुलगा गेलल्याने ते दुःख मी अजूनही पचवू शकलेलो नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

महाजनांवर चालवले टीकेचे बाण
मंत्री गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातील राजकीय विरोध जिल्ह्याला ठावूक आहे. त्यातच भाजपाकडून केंद्रात मंत्री पदावर असलेल्या मंत्री रक्षा खडसे यांनी अलीकडेच दोन्ही नेत्यांमध्ये समेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे म्हटले होते मात्र अनेक वर्ष भाजपसाठी काम केलेल्या आणि त्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेल्या एकनाथ खडसेंमधील वैर आता महाराष्ट्रातील लोकांसाठी नवं राहिलेलं नाही.
आरोपींना कुणाचेच संरक्षण नको
बीडमधील मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करणार्यांना सरकारच्या माध्यमातून किंवा समाजाच्या माध्यमातून संरक्षण असता कामा नये. संतोष देशमुख यांच्या मारेकर्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. दीड महिना होऊनही खरे मारेकरी कोण हे अद्याप समोर आलेलं नाही हे सरकारचे अपयश आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या करणार्यांना तातडीने अटक व्हावी. हा खटला जलद गती न्यायालयात चालवून मारेकर्यांना शिक्षा कशी होईल या दृष्टीने शासनाने पावलं उचलावी, असेही यावेळी एकनाथ खडसे म्हणाले आहेत.




