कुंदलगाव शिवारात भरधाव विहिरीत पडला ट्रक ; चालक, क्लीनर बेपत्ता !
जळगाव (5 जानेवारी 2025) : मालेगाव-मनमाड महामार्गावरील कुंदलगाव शिवारात चालकाचे नियंत्रण सुटल्याने मालवाहू ट्रक रस्त्याच्या कडेला 50 फूट खोल विहिरीत पडला या घटनेत ट्रक चालकासह क्लीनरही बेपत्ता झाला असून, मालेगाव येथील बचाव पथकाने दिवसभर तीन क्रेन, जेसीबीच्या मदतीने दोघांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.
दोघेही वाहनात अडकल्याची भीती
शनिवारी सायंकाळी उशिरापर्यंत दोघांपैकी कोणीही हाताशी न लागल्याने दोघेही वाहनातच अडकून पडल्याची भीती व्यक्त होत आहे. मालेगावकडून येणारा मालवाहू ट्रक (क्र.टी.एन.88 पी.1560) ला पहाटेच्या सुमारास कुंदलगाव शिवारात चौधरी मळ्यातील विहिरीत अपघात झाला. विहिरीचे मालक विजेचा पंप सुरू करण्यासाठी आले असताना त्यांना विहिरीत ट्रक दिसला. त्यांनी या घटनेची माहिती ग्रामस्थ व पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतरबचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकाने दिवसभर तीन क्रेन, जेसीबीच्या मदतीने दोघांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु सायंकाळी उशिरापर्यंत ट्रक अथवा चालक व क्लीनर यांच्यापैकी कोणालाही बाहेर काढण्यात यश आले नसल्याने त्यांना वाचविण्यासाठी बचाव पथकाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. पोलीस निरीक्षक कैलास वाघ, पोलीस हवालदार बी. व्ही. सांगळे तपास करीत आहेत.







