यावलला गावठी हातभट्टीची व पन्नीची दारू जप्त
यावल (6 जानेवारी 2025) : शहरातील बोरावल गेट भाग आणि वडर वाडा या दोन ठिकाणी यावल पोलिसांच्या पथकाने छापा टाकत दोन जणांना ताब्यात घेतले व दोघांकडून गावठी हातभट्टीची दारू तसेच पन्नीची दारू जप्त केली. तब्बल दहा हजार 500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई शनिवारी करण्यात आली.
गोपनीय माहितीवरून कारवाई
यावल शहरातील बोरावल गेट परिसर आणि वडारवाडा भागात दोन जण गावठी हातभट्टीची तसेच पन्नीची दारू विक्री करत असल्याची गोपनीय माहिती यावलचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांना मिळाली होती. त्यांनी मिळालेल्या या माहितीची खात्री करण्याकरिता सहायक फौजदार विजय पासपोळे, सहायक फौजदार हेमंत सांगळे, हवालदार राजेंद्र पवार, मोहन तायडे, राहुल अहिरे यांना सूचना केल्या. या पथकाने त्या ठिकाणी जाऊन छापा टाकला असता बोरावल गेट भागातून विशाल उर्फ गोलू भागवत भिल (24) आणि वडर वाडा भागातून सुभाष शामराव वडर (49) या दोघांना ताब्यात घेतले. यात विशाल उर्फ गोलु भील याच्याकडून साडे तीन हजार रुपये किंमतीची गावठी हातभट्टीची दारू व पन्नीची दारू जप्त केली तसेच सुभाष वडरकडून तब्बल सात हजार रुपये किंमतीची गावठी हातभट्टीची व पन्नीची दारू व कॅन असे जप्त करण्यात आले. या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले व त्यांच्याविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. यावल शहरात गावठी हातभट्टीची व पन्नीच्या दारूवर कारवाई केल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.







