मंत्रिपदाचा राजीनामा दिला का ? मंत्री धनंजय मुंडे स्पष्टच बोलले
नागपूर (7 जानेवारी 2025) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्याची चर्चा रंगत असताना यावर मुंडे यांनी स्पष्टपणे इन्कार केला आहे.
मंत्रालयात आलेल्या मुंडे यांना राजीनाम्याबाबत विचारणा केल्यानंतर त्यांनी कुठलाही राजीनामा दिला नसल्याचे सांगितल्याने तूर्तास तरी बीड प्रकरणात अजित पवार यांनी धनंजय मुंडेंना अभय दिल्याचं दिसत आहे.
बीडमधील हत्या आणि खंडणी प्रकरणावरून निर्माण झालेल्या वादंगाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी धनंजय मुंडे यांनी अजित पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर अजित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास एसआयटी, सीआयडी करत आहे. तसेच न्यायालयीन चौकशी सुरू आहे. या चौकशीमध्ये जो कोण दोषी आढळेल, त्याच्यावर कारवाई केली जाईल, असे अजित पवार यांनी पत्रकारांना सांगितले. रात्री त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन याबाबत चर्चाही केली.
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव
संतोष देशमुख हत्याप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या. हत्येत सहभागी असलेल्या सहआरोपींना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी करणारे निवेदन सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना सोमवारी दिले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, भाजप आमदार सुरेश धस, स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजे, शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड, संदीप क्षीरसागर, शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटे आदी उपस्थित होते.