आव्हाने पेलून समाज जागृती करणार्‍या पत्रकारांचे कार्य कौतुकास्पद : सहा.निरीक्षक विशाल पाटील

सावदा पोलीस स्टेशनतर्फे पत्रकारांचा सहृदय सन्मान सोहळा


सावदा (7 जानेवारी 2025) :  समाजात पत्रकारांचे स्थान महत्वाचे असून समाजातील अनेक समस्यांना वाचा फोडण्याचे काम पत्रकार करतात हे कार्य करताना अनेक आव्हानेदेखील असतात पण ही आव्हाने स्वीकारत पत्रकार प्रामाणिकपणे काम करतो. पत्रकारांनी पूर्वी समाज जागृतीचे काम केले ते काम आज देखील आवश्यक असून समाजातील अनेक चुकीच्या प्रवृत्ती विरुद्ध समाज जागृतीचे काम पत्रकारच करू शकतो, असे विचार सावद्याचे सहाय्यक निरीक्षक विशाल पाटील यांनी व्यक्त केले. पत्रकार दिनाचे औचित्य साधून 6 जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता सावदा पोलीस स्टेशनमध्ये पत्रकारांचा सहृदय सत्कार करण्यात आला.

यांची होती उपस्थिती
सावदा पोलीस स्टेशनचे सहा.निरीक्षक विशाल पाटील, उपनिरीक्षक अमोल गर्जे, सावदा येथे सेवा बजावलेले व आता चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथे कार्यरत सहा.निरीक्षक मनोज खडसे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रथम सर्व पत्रकार बांधवाना पोलिसांनी तर्फे फेटे बांधून त्यांचे स्वागत करण्यात आले.


सावदावासीयांचे प्रेम सदैव स्मरण
ब्रम्हपुरी येथील सहा.निरीक्षक मनोज खडसे यांनी सावदा शहर अतिशय चांगले व मनमिळाऊ शहर असल्याचे सांगत शहरवासीयांचे प्रेम सदैव स्मरणात राहील तसेच येथील आठवणी चिरकाल स्मरणात राहतील, असे सांगितले. उपनिरीक्षक अमोल गर्जे यांनीदेखील सावदा शहरातील नागरिक मनमिळाऊ असल्याचे सांगत येथे मला कुटुंबातील सदस्याप्रमाणे प्रेम मिळाल्याचे सांगितले. यावेळी उपस्थित सर्व पत्रकार बांधवांचा पुष्पगुच्छ व एक सुंदर पेन अशी भेट देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी सावदा, चिनावल, वाघोदा, खिरोदा, यासह सावदा पोलीस स्टेशन हद्दीतील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन पत्रकार प्रवीण पाटील यांनी केले. सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ तसेच व्हाईस ऑफ मीडियातर्फे देखील आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमा पूजन करून पत्रकार दिन साजरा करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !