सिथेंटिक ट्रॅकमुळे भुसावळात राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडणार ! राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन 

भुसावळात क्रीडा मैदानावर सिथेटिक ट्रॅकचा शुभारंभ


भुसावळ (9 जानेवारी 2025) : भुसावळातील रेल्वेच्या क्रीडांगणावर सिथेंटीक ट्रॅकची उपलब्धता झाल्याने भविष्यात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सराव करण्याची संधी मिळेल व राज्यस्तरीय, राष्ट्रीयस्तरीय स्पर्धांमध्ये त्यांना सहभागाची संधी मिळून राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू या शहरात घडतील, असा आशावाद राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी बुधवारी शहरातील पथज्योत मैदानावर आयोजित कार्यक्रमात व्यक्त केला. जळगाव येथील दीक्षांत समारंभाला उपस्थिती दिल्यानंतर राज्यपालांचे बुधवारी दुपारी 12.30 वाजता भुसावळात आगमन झाले. यावेळी त्यांच्या उपस्थितीत रेल्वे कर्मचार्‍यांचा (की मॅन) गौरव, दवाखान्याचे उद्घाटन व सिथेंटीक ट्रॅकचे उद्घाटन झाले. दरम्यान, पेटवलेली मशाल हातात घेत विद्यार्थिनींनी संपूर्ण मैदानावर चक्कर लगावला व स्तंभ मशाल राज्यपाल राधाकृष्णन यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पेटविण्यात आली.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
राज्यपाल राधाकृष्णन यांच्याहस्ते रेल्वे स्थानकावरील व्हीआयपी प्लॅटफॉर्मवर रेल्वे प्रशासनाने प्रवासी डब्यात सुरू केलेल्या दवाखान्याचे उदघाटन झाले. यावेळी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना, डीआरएम इती पाण्डेय यांच्यासह रेल्वेच्या विविध विभागातील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. त्यानंतर पथज्योत मैदानावर आयोजित कार्यक्रमात राज्यपालांचे स्वागत करण्यात आले. डीआरएम इती पाण्डेय यांनी प्रास्ताविक केले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्यासह बहुसंख्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


रेल्वे कर्मचार्‍यांचा राज्यपालांनी केला गौरव
रेल्वे रूळांची देखभाल करणार्‍या रेल्वेच्या तीन कि मॅनचा प्राथमिक स्वरूपात राज्यपाल राधाकृष्णन यांनी सत्कार केला. त्यात सुनील शांताराम, अनिलकुमार आणि छबीनाथ या कर्मचार्‍यांचा गौरव झाला.

खेळाडूंचा होणार लाभ : मंत्री सावकारे
क्रीडा क्षेत्रासाठी नावाजलेले शहर म्हणून भुसावळचा आजही उल्लेख होतो. येथे रणजी क्रिकेट मॅचेस झाल्या असून अनेक खेळाडूंनी शहराचे नाव सातासमुद्रापार पोहोचवले आहे. आता नव्याने सुरू झालेल्या ट्रॅकमुळे खेळाडूंना निश्चित त्याचा लाभ होवून शहराचा आणखी नावलौकीक वाढून खेळाडू निर्माण होतील, असा आशावाद वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी व्यक्त केला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !