चाळीसगावात मध्यरात्री गोळीबाराने खळबळ : घरावरही झाली दगडफेक
Midnight shooting causes panic in Chalisgaon : Stones were also thrown at houses चाळीसगाव (9 जानेवारी 2025) : चाळीसगाव शहरातील पोद्दार शाळेजवळ असलेल्या परीसरात मोटारसायकलीवर आलेल्या काही अज्ञात व्यक्तींनी सुमित भोसले यांच्या घरावर दगडफेक करून हवेत गोळीबार केला. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत यातील अज्ञात व्यक्ती तेथून पसार झाले. या घटनास्थळावरून एक जिवंत काडतुस, तीन खाली पुंगळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.या घटनेने या परीसरात पुन्हा खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवार, 7 रोजी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास घडली.
काय घडले नेमके
या प्रकरणी सारंग अशोक बेलदार (रा.पोद्दार शाळेच्या मागे, चाळीसगाव) यांच्याकडून घटनेची अधिक चौकशी करण्यात आली व त्यांच्या फिर्यादीनुसार, चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम 190, 191(3), 125, 324(6), 351(3), तसेच शस्त्र अधिनियम 3, 25, 27 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1)(3), 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास चाळीसगाव शहर पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी हे स्वतः करीत आहे.


मोरे यांच्या घराून अनेक हत्यारे जप्त
गुन्ह्यातील संशयीत महेंद्र (बाळू) मोरे यांच्या मुलांचा शोध घेण्यासाठी पोलिस पथक त्यांच्या घरी गेल्यानंतर तेथे कुणीही आढळले नाही. गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या हत्यारांचा शोध घेण्यासाठी महेंद्र (बाळू) मोरे यांच्या घराची त्यांचा मोठा मुलगा संकेत याच्या उपस्थितीत घरझडती घेऊन पंचनामा करण्यात आला. या पंचनाम्यात त्याच्या घरातून घातक हत्यारे जप्त करण्यात आली.
ही शस्त्र झाली जप्त
पोलिसांनी कोयता, गुप्ती, सहा जिवंत राऊंड, एक स्टीलची परशु कु-हाड, एक बेसबॉल खेळण्यासाठी वापरण्यात येणारी लाकडी बॅट होती. यावरून संकेत महेंद्र (बाळू) मोरे विरोधात अवैध शस्त्रे बाळगल्याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. तपास सहाय्यक निरीक्षक सागर कोते करीत आहेत.
यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, चाळीसगाव विभागाच्या अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर व उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी व सहकार्यांनी केली.





