पूर्णावाद नगरात गटारीचे पाणी रस्त्यावर : पालिकेचे दुर्लक्ष
यावल (9 जानेवारी 2025) : यावल नगरपालिका हद्दीतील विस्तारीत भागातील पूर्णावाद नगर भागातील गटारीचे अपूर्ण बांधकाम असल्याने सांडपाणी रहदारीच्या रस्त्यावर वाहत आहे. ही बाब नगरपालिकेच्या लक्षात आणून देऊनदेखील बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचा आरोप येथील माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी केला आहे.
अर्धवट कामामुळे सांडपाणी रिकाम्या प्लॉटमध्ये
यावल नगरपालिका हद्दीतील विस्तारीत भागातील पूर्णावाद नगर भागात नगरपरिषदेने यापूर्वी गटार बांधकाम केले आहे परंतु गटार बांधकाम अर्धवट अवस्थेत केल्याने सांडपाण्याचा निचरा रिकाम्या प्लॉटवर होत आहे. ही बाब गेल्या दोन महिन्यापूर्वी नागरिकांनी माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. तत्काळ कारवाई व्हावी म्हणून नगरपालिका प्रभारी बांधकाम अभियंता यांच्याकडे तक्रार करूनीही ती सोडविण्यात यावी यासाठी प्रत्यक्ष बांधकाम विभागाचे कर्मचारी कामील शेख व वार्षिक निविदा धारक ठेकेदार यांना त्या भागात बोलावून समस्या लक्षात आणून दिली होती. असे असूनदेखील अद्यापपर्यंत समस्या कायम आहे. गटारीतील सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याने प्रचंड दुर्गंधी पसरली असून डास व मच्छर यांचे प्रमाण वाढले आहे. या सांडपाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून रस्त्याने पायी चालणेदेखील मुश्कील झाले आहे. हे काम तत्काळ कऱण्यात यावे, अशी मागणी येथील माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी प्रशासनाकडे केली आहे. ती पूर्ण न केल्यास त्या भागातील नागरिकांसमोर नगरपालिके समोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मुख्याधिकार्यांचा कर्मचार्यांवर वचक नाही : अतुल पाटील
यावल नगरपालिकेला गेल्या तीन वर्षांपासून पूर्णवेळ मुख्याधिकारी नव्हते परंतु गेल्या तीन चार महिन्यापूर्वी नवीन मुख्याधिकारी शासनाकडून मिळाल्याने आतातरी शहरातील कामे वेळेवर होतील असे वाटत होते. परंतु मुख्याधिकारी निशिकांत गवई पूर्णवेळ उपस्थित राहत नसल्याने त्यांचा कर्मचारी वर्गावर वचक नाही. नगरपालिकेसमोर अनेक समस्या असतानादेखील त्या सोडविण्यासाठी प्रशासन असमर्थ ठरत आहे. शहरातील कर वसुली देखील अल्प प्रमाणात होत असून प्रशासन काळात नगरपालिकेचा बोजवारा उडाला आहे. कारभारात सुधारणा न केल्यास जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करून कामचुकार अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कारवाईची मागणी करू, असे अतुल पाटील म्हणाले.
