पुण्यातील पोलिस अधिकार्‍यांना अजितदादांनी फटकारले : जमत नसल्यास सांगा, बाहेरून चांगले अधिकारी पुण्यात आणतो


पुणे (10 जानेवारी 2025) : पुण्यातील कायदा सुव्यवस्थेवरून पुणे पोलिसांना चांगलेच फैलावर घेतल्याने अजित पवारांविषयी आता पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. पुण्यातील गुन्हेगारीवर पवारांनी बोट ठेवले असून गुरुवारी पुण्यातील सर्किट हाऊस येथे पुणे जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा घेतला. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी पुण्यावर पोलिसांना गुन्हेगारी रोखणे जमत नसल्यास बाहेरून चांगले अधिकारी आणणार असल्याची तंबी दिली आहे.

अजित पवार म्हणाले, शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी कमी पडतात असे माझे स्पष्ट मत आहे. या अधिकार्‍यांनी हे सर्व आमच्या आवाक्या बाहेर असल्याचे सांगावे. इतर चांगले अधिकारी आहेत त्यांना या ठिकाणी आणू आणि गुन्हेगारीला आळा घालण्याचे काम करू.

पुणे शहरात आयटी क्षेत्रात किंवा इतर क्षेत्रात काम करणार्‍या भगिनींना सुरक्षित वाटले पाहिजे. कोयता गँग, गुन्हेगारी टोळ्या यांना चाप बसलाच पाहिजे. कोयता गँगची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात होत आहे. याविषयी मी वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत बोलून योग्य तो निर्णय घेणार आहे. पुण्यातील कायदा सुव्यवस्था आणि कोयता गँगची दखल राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी देखील घेतली आहे.

जनतेने आमच्यावर विश्वास टाकला आहे. त्यांच्या विश्वासाला तडा न जाऊ देण्याची जबाबदारी आमची आहे. त्यासाठीची खबरदारी आम्ही घेणार, कुठेही कमी पडणार नाही. यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटून पुढची पावले उचलणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.


कॉपी करू नका.